दरवर्षी मुंबई (Mumbai) आणि संपूर्ण महाराष्ट्रात वार्षिक 11 दिवसांचा गणेशोत्सव (Ganeshotsav) मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवसांमध्ये खास सजावट, थीम आणि संदेश असलेल्या लोकप्रिय गणेश मंडळांमध्ये लोक गर्दी करतात. पुणे, मुंबई अशा ठिकाणी तर लाखोंच्या संख्येने भाविक बाप्पाचे दर्शन घेतात. आता या उत्सवाचे महत्त्व लक्षात घेऊन महाराष्ट्र पर्यटनाने प्रथमच 60 वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी गणेश पंडाल हॉपिंग टूर (Pandal-Hopping Tours) म्हणजेच गणपती दर्शन यात्रा सुरू केली आहे.
या दौऱ्यात गणपती मंडळांच्या दर्शनासाठी ज्येष्ठ नागरिक मुंबई, ठाणे, नागपूर, पुणे अशी शहरे निवडू शकतात. मुंबईतील महाराष्ट्र पर्यटन GSB वडाळा, गणेश गली लालबाग, विलेपार्ले पेशवे गणपती, खेतवाडीचा राजा आणि सिद्धिविनायक मंदिर यासारख्या लोकप्रिय गणेश मंडळांचा समावेश असेल.
पुण्यात, कसबा गणपती, दगडूशेठ आणि तुळशीबाग गणपती यासह इतर मंडळे समाविष्ट केले जातील. ज्येष्ठ नागरिकांसाठी या स्पेशल टूरचा लाभ घेण्यासाठी, स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण झाल्याने, 75 रुपये दर आकारला जाईल. इच्छुक व्यक्ती महाराष्ट्र पर्यटन वेबसाइटवर नोंदणी करू शकतात. महाराष्ट्र पर्यटन विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, या यात्रेसाठी 1,2,5,6 आणि 7 सप्टेंबर रोजी 25-30 आसनी वातानुकूलित बस उपलब्ध करून दिली जाईल. (हेही वाचा: चिंचपोकळीचा चिंतामणी आगमन सोहळ्यात चोरांचा डल्ला, 76 भक्तांचे मोबाईल, सोन्याच्या साखळ्या लंपास)
मुंबईत सकाळी 9 ते संध्याकाळी 5 दरम्यान हा दौरा असेल. पुण्यात सहलीची वेळ सकाळी 8:30 ते दुपारी 12:30 दरम्यान असेल, तर नागपूर आणि ठाण्यात 9 ते 5 वाजेपर्यंतची वेळ असेल. अनेक ज्येष्ठ नागरिक आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी या सहलीत रस दाखवला आहे. इच्छुक अर्जदारांना लसीकरण प्रमाणपत्र, आधार कार्ड आणि इतर वैध तपशील प्रदान करावे लागतील. या बसमध्ये एक टूर गाईड असेल आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी डॉक्टरही संपर्कात असतील.