Makar Sankranti 2019 : बघता बघता 2018 संपून नव्या वर्षाला सुरुवातही झाली. आता वेध लागले आहेत 2019 मधील पहिल्या सणाचे म्हणजेच मकर संक्रांती (Makar Sankranti)चे. नवीन वर्षातील पहिला सण म्हणूनही मकर संक्रांतीचे खास महत्व आहे. भारतात सर्वत्र मोठ्या धुमधडाक्यात 14 जानेवारीला मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो. मात्र यावर्षी हा सण 15 जानेवारीला साजरा होणार आहे. जानेवारी 2019 मध्ये येणारा संक्रांती सण यावर्षी 2 दिवस साजरा केला जाईल. यावेळी संक्रांतीचे वाहन सिंह असून उपवाहन गज म्हणजे हत्ती आहे. यामुळे वर्षभर कामाचा व्याप, गतिशीलता, राजकारणात परिवर्तन, आर्थिक स्थितीमध्ये अडचणी यासारखे प्रभाव दिसून येतील.
संक्रांत म्हणजे संक्रमण, सूर्याचे एका राशीतून दुसऱ्या राशीत होणारे मार्गक्रमण. सूर्याने मकर राशीत प्रवेश केल्यानंतर मकरसंक्रांतीचा सण साजरा केला जातो. यावर्षी 14 जानेवारीला संध्याकाळी 7 वाजून 51 मिनिटांनी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे. यामुळे स्नान आणि दानाचे महत्त्व 15 जानेवारीला मानले जाईल. तर मकर राशीचा पुण्यकाळ 14 जानेवारीला 1.28 ते 15 जानेवारीला 12 वाजेपर्यंत राहील. 15 जानेवारीला सकाळपासूनच अमृतसिद्धी योग राहील. या योगामध्ये करण्यात आले दान-पुण्य अमृत समान मानले जाते.
मकर संक्रातीला सूर्याचे उत्तरायण होते. त्यानंतर खरमास सप्ताह असतो. खरमास संप्ताहात कुठलीही चांगली कामे करू नये, पण खरमास सप्ताह संपल्यानंतर शुभ कामांचा योग सुरू होतो.
संक्रांतीचा आदला दिवस हा भोगी म्हणून साजरा करतात. या दिवशी तीळमिश्रीत पाण्याने स्नान करतात. या दिवशी तीळाची भाकरी, वांग्याचे भरीत अन् मिश्र भाजी खाण्याची प्रथा आहे. संक्रांतीच्या दिवशी सर्वांना तिळगुळ वाटून हा दिवस साजरा केला जातो. आपली जुनी भांडणे-वैरे विसरून, पुन्हा स्नेहाचे, सलोख्याचे संबंध निर्माण करण्यासाठी ही मोठी संधीच असते जणू.
संक्रांतीचे महत्व –
दान – मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान, दान, जप, तपाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी केलेल्या दानाची दान करणाऱ्याला परतफेड मिळतेच असे सांगितले जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी तूप, तीळ, खिचडी या दानाला खास महत्त्व आहे. संक्रांती पर्वकाळात चांदी किंवा तांब्याच्या कलशात पांढरे किंवा काळे तीळ भरून ब्राह्मणांना दान करा. तांदूळ, पीठ, चांदी, दूध, रवा, नारळ, गूळ, वस्त्र दान करावे. प्रत्येक व्यक्तीने आपापल्या राशीनुसार दान करणे चांगले.
काळी वस्त्रे – काळी वस्त्रे उष्णता शोषून घेतात म्हणून यादिवशी काळ्या वस्त्रांचे विशेष महत्व आहे. लग्नानंतरच्या प्रथम येणा-या संक्रांतीला नवविवाहित मुलींसाठी खास काळया रंगाच्या वस्त्रांची खरेदी केली जाते. त्यांना हलव्याचे दागिने घालतात व सुवासिनींना हळदीकुंकवासाठी बोलावतात.
बोर न्हाण - संक्रांतीनंतर रथसप्तमीपर्यंत कोणत्याही दिवशी लहान मुलांचे 'बोर न्हाण' केले जाते. चिरमुरे, बोरे, हरभरे, उसाचे तुकडे, हलवा असे मिश्रण लहान मुलांंच्या डोक्यावर घातले जाते.
पतंगोत्सव – संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्याचेही विशेष महत्व आहे. पतंग उडवताना उत्तरायणातील सूर्याची किरणे आरोग्यासाठी लाभदायक असतात.
संक्रांतीचे पौराणिक महत्वही आहे. पितामह भीष्मांना इच्छामरण होते. त्यावेळी मृत्युशय्येवर पडलेल्या भीष्मांनी देहत्यागासाठी उत्तरायणाचा काळ निवडला होता. सूर्याने मकर राशीत प्रवेश केल्यानंतर भीष्मांनी देहत्याग केला.
दक्षिणेत याच वेळी पोंगल नावाचा तीन दिवस चालणारा उत्सव असतो. पहिल्या दिवशी इंद्राप्रीत्यर्थ भोगी पोंगल वा इंद्रपोंगल, दुसऱ्या दिवशी सूर्याप्रीत्यर्थ सूर्यपोंगल आणि तिसऱ्या दिवशी गायीसाठी मट्टपोंगल साजरा केला जातो. तर उत्तर भारतात 13 जानेवारी या दिवशी लोहारी सण साजरा केला जातो.