Teachers’ Day 2020: शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी शिक्षक दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण असतो. या दिवशी विद्यार्थी आपल्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करतात. शिक्षकांनी दिलेले योगदान आणि निरंतर समर्थन यांच्याबद्दल शिक्षकांचे आभार मानण्यासाठी शिक्षक दिनाची संधी मिळते. जगभरातील तमाम देशात वेगवेगळ्या दिवशी शिक्षक दिन (Teachers’ Day) साजरा केला जातो. भारतात 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो. भारतात शिक्षक दिन भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन (Dr. Sarvepalli Radhakrishnan) यांच्या जयंती दिवशी साजरा केला जातो. पण 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा करण्याचे कारण काय? काय आहे शिक्षक दिनाचा इतिहास आणि महत्त्व? जाणून घेऊया...
शिक्षक दिन तारीख:
भारतात दरवर्षी 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो. या दिवशी महान शिक्षक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती असते. हा दिवस देशभरातील सर्व शिक्षकांच्या योगदानाबद्दल त्यांना समर्पित करण्यात आला आहे. या दिवशी शिक्षकांना त्यांच्या योगदानाबद्दल सन्मानित करण्यात येते आणि त्यांच्या प्रती आभार व्यक्त केले जातात.
शिक्षक दिनाचे इतिहास व महत्त्व:
5 सप्टेंबर रोजी स्वतंत्र भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन (Dr. Radhakrishnan) यांची जयंती असते. प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ आणि शिक्षक अशी डॉ. राधाकृष्णन यांची जगभरात ख्याती आहे. शिक्षणाला सर्वाधिक महत्त्व देताना त्यांनी भारत सरकारला सल्ला दिला होता की, फक्त सर्वश्रेष्ठ बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्तींनाच शिक्षक म्हणून जबाबदारी सोपवावी. डॉ. राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 रोजी झाला होता. त्यांनी भारतातील आणि आंतरराष्ट्रीय महाविद्यालयांमध्ये प्राचार्य म्हणून काम केले होते.
डॉ. एस राधाकृष्णन जेव्हा भारताचे राष्ट्रपती झाले तेव्हा त्यांचे काही विद्यार्थी आणि मित्र त्यांच्याकडे गेले. आणि त्यांचा वाढदिवस साजरा करण्याची परवानगी मागितली. तेव्हा त्यांनी माझा जन्मदिवस साजरा करण्याऐवजी 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केल्यास हे माझे सौभाग्य असेल, असे म्हटले. त्यानंतर त्यांच्या जयंती दिवशी म्हणजेच 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो. या दिवशी शिक्षकांच्या सन्मानार्थ शाळा, महाविद्यालये आणि इतर संस्थांमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.