Surya Tilak at Ram Temple: रामनवमीच्या दिवशी रामलल्लाच्या मूर्तीवर होणार 4 मिनिटांचा 'सूर्य तिलक'; अयोध्येत जय्यत तयारी सुरु, जाणून घ्या सविस्तर
Ram lalla | Twitter

Surya Tilak at Ram Temple: यावर्षीचा 22 जानेवारी 2024 हा दिवस भारताच्या इतिहासातील सुवर्ण दिवस ठरला. या दिवशी राम जन्मभूमी असलेल्या अयोध्येत (Ayodhya) 500 वर्षांच्या खडतर संघर्षानंतर रामलल्ला मंदिराचे (Ramlalla Temple) उद्घाटन आणि मूर्तीची प्रतिष्ठापना झाली. आता रामलल्लाच्या अभिषेकानंतर अयोध्येमध्ये पहिली रामनवमी साजरी केली जाणार आहे. शहरात भगवान राम जयंतीच्या ऐतिहासिक सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. यावेळी रामलल्लाचा 'सूर्य तिलक' (Surya Tilak) करण्यात येणार आहे. म्हणजेच रामनवमीला रामलल्लावर सूर्यकिरणांनी अभिषेक केला जाणार आहे.

रामनवमीला होणारा सूर्य तिलक सोहळा दुपारी बारा वाजता सुरू होईल, जो रामलल्लाच्या जन्माचा शुभ मुहूर्त आहे. या विधी दरम्यान, सूर्याची किरणे सुमारे चार मिनिटे 75 मिमी वर्तुळाकार तिलकाने रामलल्लाच्या दिव्य मुखाला प्रकाशित करतील. हा सूर्य तिलक फक्त रामनवमीच्या दिवशीच केला जाणार आहे.

रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे संयोजक चंपत राय म्हणाले की, 'शास्त्रज्ञ या अनोख्या कार्यक्रमासाठी काळजीपूर्वक तयारी करत आहेत. रामलल्लावर सूर्य किरणांनी अभिषेक करण्यासाठी राम मंदिरात उपकरणे बसवली जात असून ती चाचणीसाठी सज्ज आहे. आम्हाला पूर्ण आशा आहे की आम्ही या वर्षीच रामलल्लाचा सूर्य तिलक सोहळा पार पडेल. सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिट्यूट, रुरकी यासाठी काच, लेन्स आणि पितळ वापरणार आहे. बॅटरी किंवा वीज नसलेली ही यंत्रणा रामनवमीच्या दिवशी भगवान रामांना दिव्य तिलक प्रदान करेल. (हेही वाचा: Gudi Padwa 2024: गुढी कशी उभारायची? जाणून घ्या, गुढीचे महत्त्व आणि पद्धत)

रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे कार्यालयीन प्रभारी प्रकाश गुप्ता म्हणाले की, जेव्हा मंदिराचे बांधकाम सुरू झाले तेव्हाच असे ठरले होते की, सिंहासनावर विराजमान झाल्यानंतरच्या पहिल्या रामनवमीच्या दिवशी भगवान श्री. रामाच्या मूर्तीवर सूर्य तिलक केला जाईल. आता याची जय्यत तयारी सुरु झाली आहे. राम मंदिर ट्रस्टच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भात नुकतीच देशातील शास्त्रज्ञांची चेन्नईत बैठक घेतली. मंगळवारपासून देशभरात चैत्र नवरात्रीला सुरुवात होत असून 17 एप्रिल रोजी रामनवमीचा सण साजरा होणार आहे.