लखलखत्या दिव्यांच्या प्रकाशात मोठ्या धुमधडाक्यात साजरा होणारा उत्सव म्हणजे दिवाळी. अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा सण म्हणून दिवाळीकडे पहिले जाते. तब्बल पाच दिवस हा सण भारतात सर्वत्र साजरा केला जातो. धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज असे हे पाच दिवस दिव्यांनी, गोडाधोडानी, नवीन कपडे, भेटवस्तू, नवा उत्साह या सर्वांनी भारलेले असतात. या दिवाळीच्या पाचही दिवसांचे स्वतःचे असे वेगळे महत्व आहे. प्रत्येक दिवसामागे काही महत्वाची कारणे, त्या त्या दिवसांच्या कथा निगडीत आहेत. यापैकी दिवाळीचा तिसरा दिवस, म्हणजे लक्ष्मीपूजनाचा दिवस सर्वात महत्वाचा मानला गेला आहे. प्रत्येक घरात यादिवशी लक्ष्मी-कुबेराची पूजा केली जाते. चला तर पाहूया काय महत्व लक्ष्मीपूजनाचे
अश्विन वद्य अमावस्या म्हणजे ‘लक्ष्मीपूजना’चा दिवस. दिवाळीच्या लक्ष्मीपूजनादिवशी सूर्य आपल्या दुसऱ्या चरणात प्रवेश करतो. अमावस्या असूनही या दिवसाला अतिशय शुभ मानले जाते. प्राचीन काळी या रात्री कुबेरपूजन करण्याची रीत होती. कुबेर हा धनसंपत्तीचा स्वामी मानला जातो. कालांतराने कुबेराबरोबरच लक्ष्मीचीही पूजा होऊ लागली. घरामध्ये सुखशांती आणि धनाची देवी महालक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहावा यासाठी लक्ष्मीपूजन केले जाते. या दिवशी प्रदोषकाळी (संध्याकाळी) लक्ष्मीचे पूजन करतात. लक्ष्मी ही फार चंचल असते असा समज आहे. त्यामुळे, शक्यतोवर हिंदू शास्त्राप्रमाणे लक्ष्मीपूजन हे, लक्ष्मी स्थिर रहावी म्हणून, स्थिर लग्नावर करतात.
यादिवशी अभ्यंगस्नान केले जाते, घर-गोठा स्वच्छ करून घरात गोमुत्र शिपंडून घर पवित्र करतात. व्यापारी लोक त्यांच्या वह्या-चोपड्यांची पूजा करतात. या दिवसानंतरच व्यापारांचे नवीन आर्थिक वर्षे सुरु होते. अजून एक महत्वाची गोष्ट या दिवशी केली जाते ती म्हणजे नव्या झाडूची खरेदी. झाडूला साक्षात लक्ष्मी मानून, तिच्यावर पाणी शिंपडून, तिला सवाष्ण लक्ष्मी मानून तिची हळद-कुंकू वाहून मनोभावे पूजा करतात व ती नंतरच घरात वापरण्यास सुरुवात करतात. (हेही वाचा : Diwali 2018 : धनत्रयोदशीला या गोष्टींचे केलेले दान; बनवेल तुम्हाला धनवान)
या दिवशी भगवान विष्णूंनी बळीला पाताळात धाडून, लक्ष्मीसह सर्व देवतांना बळीच्या जाचातून मुक्त केले आणि यानंतर सर्व देव क्षीरसागरात जावून झोपले. या आनंदाप्रीत्यर्थ सर्वजण दीपोत्सव साजरा करतात. याच दिवशी प्रभू रामचंद सीतामाईला घेऊन आयोध्येत आले होते. याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने समाधी घेतली. याच दिवशी भगवान महावीर मोक्षाला गेले, आणि याच दिवशी संध्याकाळी महावीरांचे प्रमुख शिष्य गौतम गणधर यांना केवल ज्ञान प्राप्त झाले.
दिवाळीसाठी पूर्वी जमिनीवर प्रथेप्रमाणे तांदळाच्या ओल्या पिठाची रांगोळी काढतात. त्याला 'मांडणे' असे म्हणतात. त्यावर पाट मांडून लक्ष्मीपूजन किंवा ओवाळणे आदी विधी केले जातात. एका लाकडी पाटावर गुलाबाच्या पाकळ्या ठेवून अक्षतांचे स्वस्तिक काढावे. त्यावरच श्री लक्ष्मी व श्री कुबेराची मूर्ती याची मनोभावे पूजा करावी. लाह्या बत्तासेचा नैवेद्य दाखवावा, श्री सूक्ताचे पाठ करावे. योग्य मुहूर्तावर लक्ष्मी पूजन केल्यास ते लाभदायक ठरते, असे म्हटले जाते.
आश्विन अमावास्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते आणि आपल्या निवासासाठी योग्य असे स्थान शोधू लागते. जेथे चारित्र्यवान, कर्तव्यदक्ष, संयमी, धर्मानिष्ठ, देवभक्त आणि क्षमाशील पुरुष आणि गुणवती आणि पतीव्रता स्त्रिया असतात, त्या घरी वास्तव्य करणे लक्ष्मीला आवडते.