Friendship Marriage: प्रेम नाही, सेक्स नाही, जपानमध्ये होत आहेत अनोखे विवाह, जाणून घ्या काय आहे नवीन रिलेशनशिप ट्रेंड 'फ्रेंडशिप मॅरेज'
Friendship Marriage (Photo Credit : Pixaby)

Friendship Marriage Trend In Japan: आजकाल लोकांसाठी नात्याची व्याख्या, परिभाषा झपाट्याने बदलत आहे. ठरवून केलेले लग्न, प्रेमविवाह, लिव्ह-इन रिलेशननंतर जगभर नात्यांमध्ये दररोज वेगवेगळे ट्रेंड पाहायला मिळत आहेत. आता जपानमध्ये (Japan) एक नवीन प्रकारचे नाते लोकप्रिय होत आहे. येथील तरुणांमध्ये ‘फ्रेंडशिप मॅरेज’ची (Friendship Marriage) क्रेझ पाहायला मिळत आहे. साउथ चायना मॉर्निंग पोस्ट (SCMP) च्या मते, या नवीन प्रकारच्या वैवाहिक नात्यात लोक एकमेकांवर प्रेम न करता किंवा शारीरिक संबंध न ठेवता प्लॅटोनिक पार्टनर बनत आहेत.

आजकाल लग्नाबाबत लोकांमध्ये खूप उदासीनता आहे. लोक एकटे राहणे पसंत करत आहेत. आपल्या आवडीचा जोडीदार न मिळाल्यास लग्न न करणारे आणि केले तरी ते सांभाळता येत नाहीत, असे अनेक जण आहेत. अनेक ठिकाणी असे देखील दिसून आले आहे की, काही लोक प्रेमात असतात परंतु ते लैंगिक संबंध ठेवण्यास किंवा लग्नाच्या सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे अशा लोकांमध्ये जपानमधील हे अनोखे लग्न एक लोकप्रिय ट्रेंड बनत चालला आहे.

या नवीन प्रकारच्या लग्नाला फ्रेंडशिप मॅरेज असे नाव देण्यात आले आहे. या लग्नाची सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुम्ही, लग्न कराल पण तुमच्या जोडीदाराशी संबंध ठेवण्यासाठी किंवा प्रेम टिकवण्यासाठी तुम्हाला जबरदस्ती करता येणार नाही. अहवालानुसार, या प्रकारच्या विवाहांतर्गत लोक प्रेमात न पडता किंवा सेक्स न करता फक्त एकमेकांचे 'प्लेटोनिक पार्टनर' बनून राहत आहेत. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, जपानच्या 124 दशलक्ष लोकसंख्येपैकी सुमारे एक टक्का लोक या प्रकारचे नाते निवडत आहेत. यामध्ये बहुधा अविवाहित, प्रेम न मिळालेले, समलैंगिक किंवा अलैंगिक आणि पारंपारिक विवाहाबद्दल भ्रमनिरास झालेल्या लोकांचा समावेश होतो.

फ्रेंडशिप मॅरेज करणाऱ्या लोकांची संख्या-

जपानमध्ये फ्रेंडशिप मॅरेज म्हणजेच ‘मैत्री विवाह’ आयोजित करणाऱ्या कलर्स नावाच्या एजन्सीने या प्रकारच्या लग्नाशी संबंधित डेटा शेअर केला आहे. त्यानुसार, मार्च 2015 पासून आतापर्यंत सुमारे 500 लोकांनी जपानमध्ये अशा प्रकारे लग्न केले आहे आणि आता हा आकडा दरवर्षी 1000 च्या जवळ पोहोचत आहे. एजन्सीच्या एका सर्वेक्षणात आढळले आहे की, जे मैत्री विवाह करतात ते खूप आनंदी आहेत आणि सामान्य जीवन जगत आहेत.

मैत्री विवाह कायदेशीर आहे का?

जपानमध्ये मैत्री विवाहाला कायदेशीर मान्यता आहे. नात्यामध्ये नवरा-बायकोमध्ये सेक्स व्हायलाच पाहिजे असे नाही. याबाबत कोणीही आरोप करू शकत नाही किंवा कोणावर दबाव आणू शकत नाही. कारण या लग्नाची ही पहिली अट आहे. तसेच, हे जोडीदार त्यांच्या इच्छेनुसार एकत्र राहू शकतात किंवा वेगळेही राहू शकतात. (हेही वाचा: Miracle of Love: पत्नीच्या प्रेमापोटी वनस्पतिजन्य अवस्थेतून परतला पती, 10 वर्षे होता कोमात)

याशिवाय अशा विवाहित जोडप्यांना कृत्रिम गर्भाधानाद्वारे मुले जन्माला घालण्याची परवानगी आहे. म्हणजेच, जर जोडप्याचे एकमेकांशी शारीरिक संबंध नसतील तर त्यांना सरोगसी किंवा कृत्रिम गर्भधारणेद्वारे मुले होऊ शकतात. इतकेच नाही तर या नात्यातील लोक ओपन रिलेशनशिपमध्येही राहू शकतात, ज्याला भारतासारख्या समाजात ‘एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर’ म्हणतात. म्हणजेच, मैत्री विवाहात तुमच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव टाकला जात नाही.

मैत्री विवाह कोण करू शकतो?

जपानच्या कायद्यानुसार हे मैत्री विवाह कोणीही करू शकतो. यासाठी तुम्हाला तुमच्या मित्रासोबतच किंवा मैत्रिणीसोबतच लग्न करणे बंधनकारक नाही. तुम्ही तुमच्या आवडीचा जोडीदार निवडू शकता. लग्नाआधी हे लोक एकत्र भेटतात आणि लग्नानंतर घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर चर्चा करतात. लग्न झाल्यावर काय करायचे, कसे राहायचे, घरातीक कामांचे विभाजन, आर्थिक बाबी इ. विषयांवर सविस्तर बोलतात आणि त्यानंतरच निर्णय घेतला जातो.

दरम्यान, तीन वर्षांपासून मैत्री विवाहात असणाऱ्या एका व्यक्तीने सांगितले की, मैत्री विवाह म्हणजे समान आवड असलेले रूममेट शोधण्यासारखे आहे. या नात्यामध्ये दोघेही आपली सुख-दुःखे एकमेकांशी शेअर करतात, गरज पडल्यास एकमेकांना मदत करतात, परंतु कायद्याने ते एकमेकांवर आपला हक्क दाखवू शकत नाहीत.