कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटामुळे अवघे जग चिंतीत आहे. कोरोनावर कोणतीही लस, औषध, प्रतिजैवक अथवा उपचार नाही. त्यामुळे एकमेकांपासून संपर्क कमी ठेवणे म्हणजेच सोशल डिस्टंन्सीग हाच केवळ एक उपाय आहे. त्यामुळे जगभरातील अनेक देशांनी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या निर्णयामुळे आणखी एक भलताच सामाजिक मुद्दा समोर आला आहे. तो म्हणजे पती-पत्नींमधील विसंवाद. लॉकडाऊन काळात जगभरातील अनेक देशांमध्ये घटस्फोट (Divorce) घेण्याचे प्रमाण वाढले आहे. हे प्रमाण विचारात घेऊन जपानमधील एका कंपनीने एक वेगळीच शक्कल लढवली आहे. लॉकडाऊन काळात ताण-तणावात असलेल्या पती पत्नींनी घटस्फोट घेऊन नये. तसेच, कोरोना व्हायरस पासून त्यांचा बचाव व्हावा यासाठी एक वेगळाच व्यवसाय सुरु केला आहे.
जपानमधील शॉर्ट टर्म रेंटल फर्म नावाच्या एका कंपनीने आपल्या रिकाम्या अपार्टमेंटचे मार्केटींग सुरु केले आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, ताणतणावात असलेल्या आणि एकमेकांशी मतभेद होत असल्यनेक विभक्त होण्याचा मार्ग स्वीकारणाऱ्या पतीपत्नींना वेगळे ठेवण्याची भूमिका मांडली आहे. ही कंपनी टोकिओ येथील असून, कासोकु असे या कंपनीचे नाव असल्याचे समजते. या कंपनीने ग्राहकांना 'कोरोना व्हायरस, लॉकडाऊन काळात घटस्फोट घेण्यापूर्वी कृपया आमच्याशी संपर्क साधा' असे म्हटले आहे. जे लोक आपल्या कुटुंबासोबत वेळ न घालवता व्यक्तिगतरित्या एकट्याने वेळ घालवू इच्छितात अशा लोकांनी कंपनीकडे संपर्कही केल्याचे वृत्त आहे.
जपानच्या सरकारने कोरोना व्हायरस नंतर 7 प्रदेशांमध्ये आणिबाणिची घोषणा केली आहे. या प्रदेशामध्ये घराबाहेर पडण्यावर बंदी नाही. मात्र, कारणाशिवाय एकत्र येण्यावर प्रतिबंध आहेत. शाळा, महाविद्यालयं बंद आहेत. अनेक लोक घरुन काम करत आहेत. जे लोक कासोकु कंपनीच्या ऑफरनुसार त्यांच्या अपार्टमेंटमध्ये राहू इच्छितात त्या लोकांना प्रतिदिन 3 हजार रुपये खर्च करावे लागतील. कंपनीच्या प्रवक्त्याने म्हटले आहे की, 3 एप्रिल पासून कंपनीने ही सेवा सुरु केली आहे. आतापर्यंत त्यांना 20 ग्राहकही मिळाले आहेत. या कंपनीकडून घटस्फोटासाठी 30 मिनिटे मोफत सल्लाही दिला जातो आहे म्हणे. लाईव्ह मिंटने याबाबत वृत्त दिले आहे. (हेही वाचा, ऐकावे ते नवलच! कोरोना विषाणूमुळे वाढले घटस्फोटांचे प्रमाण; विभक्त होण्यासाठी एका महिन्यात 300 हून अधिक अर्ज, जाणून घ्या कारण)
कंपनीच्या प्रवक्त्याने पुढे म्हटले आहे की, त्यांच्याकडे आलेल्या एका महिला ग्राहकाने सांगितले की, ती पतीसोबत भांडण झाल्याने घरातून पळून गेली. दुसऱ्या एका महिलेने सांगितले की, ती स्वत:साठी काही काळ वेळ काढू इच्छिते. कारण, सध्या शाळाही बंद आहेत. त्यामुळे मुलेही घरी आहेत आणि पतीही घरुन काम करतो आहे. आमच्याकडे किती लोक घसस्फोट घेण्यास तयार आहेत याबाबत अधिकृत आकडा उपलब्ध नाही, असेही कंपनीने म्हटले आहे. दरम्यान, प्रसारमाध्यमांनी मात्र म्हटले आहे की, चीन आणि जपानमध्ये घटस्फोटाच्या संख्येत बरीच वाढ झाली आहे.