कोरोना विषाणूमुळे (Corona Virus) जगभरात विनाश ओढवला आहे. या धोकादायक विषाणूमुळे आतापर्यंत सहा हजाराहून अधिक लोकांचा बळी गेला आहे, तर लाखो लोकांना याचा संसर्ग झाला आहे. चीनमध्ये (China) गोष्टी अजूनच वाईट आहेत. कोरोना विषाणूमुळे इथली बरीच शहरे बंद आहेत, लोक घरात कैद आहेत, वाहतूक काही प्रमाणात ठप्प आहेत. चीनमध्ये आता घरात तुरुंगवास भोगणे ही पती-पत्नीसाठी समस्या बनत आहे. हजारो लोकांचा बळी घेतल्यानंतर आता कोरोना व्हायरसची वक्रदृष्टी वैवाहिक जीवनावर पडली आहे. घरी सतत एकत्र असल्याने पती-पत्नीमध्ये वाद होत आहेत आणि या वादामुळेच चीनमध्ये घटस्फोटाचे (Divorce) प्रमाण वाढत आहेत.
चीनच्या शिचुआन प्रांतात एका महिन्यात 300 हून अधिक जोडपी घटस्फोट घेण्यास तयार आहेत, ज्यासाठी त्यांनी अर्ज दाखल केला आहे. चीनी मीडिया रिपोर्ट्स आणि ग्लोबल टाईम्सच्या वृत्तानुसार, घटस्फोटासाठी दाखल केलेल्या अर्जांमागील सर्वात मोठे कारण म्हणजे, पती-पत्नीमधील वाद असल्याचे बोलले जात आहे. पती-पत्नींना बरेच दिवस घरात राहण्यास सांगितले जात आहे आता हेच वादाचे कारण बनत चालले आहे. कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी सरकारने सर्व नागरिकांना त्यांच्या घरीच राहायला भाग पाडले असल्याने, पती-पत्नीमध्ये वाद वाढत जात आहे आणि ही प्रकरणे घटस्फोटापर्यंत पोहचली आहेत. (हेही वाचा: नवऱ्याचे अतिप्रेम; पण कधीच भांडण होत नाही म्हणून बायकोने मागितला घटस्फोट)
चीनमधील कोरोनाचा विनाश टाळण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. ऑर्डरनंतर, लोक 1 महिन्यासाठी घराबाहेर पडू शकले नाहीत. लॉकडाऊन दरम्यान, आपत्कालीन परिस्थितीतच लोकांना घर सोडण्याची परवानगी देण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, घरात दीर्घकाळ राहणाऱ्या जोडप्यांमध्ये होणाऱ्या क्षुल्लक भांडणांनी एक भयानक रूप धारण केले आणि आता अशी अवस्था झाली आहे की, त्यांना एकमेकांपासून विभक्त व्हायचे आहे.