Pandharpur Wari 2026 Schedule: महाराष्ट्राचे आराध्य दैवत भगवान विठ्ठलाच्या दर्शनासाठी दरवर्षी देहू आणि आळंदी येथून निघणारी पंढरपूर वारी (पालखी सोहळा) लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान आहे. 2026 मध्ये आषाढी एकादशी 25 जुलै 2026 रोजी साजरी केली जाणार आहे. वारी ही केवळ धार्मिक यात्रा नसून ती समता आणि बंधुभावाचे प्रतीक आहे. यामध्ये जात, धर्म आणि गरीब-श्रीमंत असा कोणताही भेदभाव नसतो. वारकरी आपल्या खांद्यावर भगवी पताका घेऊन विठ्ठलाच्या चरणी लीन होण्यासाठी हा खडतर प्रवास आनंदाने पूर्ण करतात.
2026 पालखी प्रस्थान वेळापत्रक
वारकरी संप्रदायाचा हा सर्वात मोठा उत्सव असून, २०२६ मधील पालखी प्रस्थानाच्या प्रमुख तारखा खालीलप्रमाणे आहेत:
संत तुकाराम महाराज पालखी (देहू): 7 जुलै 2026 रोजी देहू येथून प्रस्थान होईल.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी (आळंदी): 8 जुलै 2026 रोजी आळंदी येथून प्रस्थान होईल.
आषाढी एकादशी (मुख्य दिवस): 25 जुलै 2026.
हे दोन्ही पालखी सोहळे सुमारे 21 दिवसांचा पायी प्रवास करून आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी पंढरपूरमध्ये दाखल होतात.
700 वर्षांची परंपरा
पंढरपूरची वारी ही 700 वर्षांहून अधिक जुनी परंपरा आहे. भगवान विठ्ठलाला (कृष्ण स्वरूप) भेटण्यासाठी वारकरी विठूनामाचा जयघोष करत शेकडो मैलांचा प्रवास करतात. या प्रवासात भजन, कीर्तन आणि 'रिंगण' सोहळे हे मुख्य आकर्षण असतात.
वारीचा मार्ग आणि सहभाग
पुणे जिल्ह्यातील देहू येथून जगद्गुरु तुकाराम महाराज यांची पालखी निघते, तर आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी मार्गस्थ होते. वाटेत महाराष्ट्रातील विविध भागांतून येणाऱ्या शेकडो छोट्या-मोठ्या पालख्या या मुख्य प्रवाहात सामील होतात. चंद्रभागेच्या तीरावर भक्तीचा महासागर लोटलेला असतो.