श्री महालक्ष्मी (Photo credit : youtube)

Margashirsha Thursdays Lakshmi Puja : वर्षाच्या शेवटच्या महिन्यात ख्रिसमस, दत्त जयंती यांसारखे अनेक उत्सव साजरे होतात. यातच डिसेंबर महिन्यात अनेक व्रत वैकल्येही केली जातात. डिसेंबर म्हणजेच मराठी मार्गशीर्ष (Margashirsha) महिना, या महिन्यात प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत (Mahalakshmi Vrat) केले जाते. कुटुंबाला समाधान, शांती, ऐश्वर्य मिळावे, तसेच श्रीलक्ष्मीची आपल्यावर सदैव कृपा राहावी म्हणून हे व्रत केले जाते. या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी करून, चार गुरुवार हे व्रत केले जाते. शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन केले जाते. पद्मपुराणात या व्रताचा उल्लेख आढळतो. पद्‌मपुराणात संसारी माणसांसाठी हे व्रत सांगितले आहे, त्यामुळे पती-पत्नी दोघे मिळून हे व्रत करू शकतात. चला तर पाहूया काय आहे हे श्री महालक्ष्मी व्रत आणि ते कसे केले जाते.

श्री महालक्ष्मी व्रतावेळी जी  कहाणी वाचली जाते ती द्वापार युगातील आहे. भद्रश्रवा राजा आणि त्याची राणी सुरतचंद्रिका यांना वैभव प्राप्त झाल्यानंतर लक्ष्मीचा विसर पडला. त्यानंतर महालक्ष्मीचा कोप होऊन होते नव्हते ते सारे वैभवही त्यांना गमवावे लागले. अशा वेळी लक्ष्मीने कशा प्रकारे राणीला तिची चूक दाखवून दिली, आणि परत देवीची उपासना केल्यावर गमावलेल वैभव परत मिळाले, हे सांगणारी ही कथा आहे. या कथेचा उद्देश ‘उतू नये मातु नये, घेतला वसा टाकू नये’ हाच आहे. कोणत्याही गोष्टीचा गर्व करू नये. सत्ता, संपत्ती कितीही वाढली तरी आपले पाय जमिनीवर असावे.

पूजेची मांडणी - घरातील पूजेची जागा स्वच्छ करून त्यावर पाट किंवा चौरंग मांडावा. चौरंगावर कोरे (नवीन कापड) अंथरावे. कापडावर गहू वा तांदूळ यांची रास घालून त्यावर तांब्याचा कलश ठेवावा. कलशात दूर्वा, पैसा आणि सुपारी घालावी. विड्याची पाने अथवा आंब्याची डहाळी, पंचपत्री कलशावर ठेवावी व त्यावर नारळ ठेवावा. चौरंगावर वा पाटावर श्री लक्ष्मीदेवीचा फोटो ठेवावा किंवा घरी लक्ष्मीची मूर्ती असल्यास ती चौरंगावर वा पाटावर ठेवावी. मूर्तीपुढे विडा, खोबरे, खारीक, बदाम, इतर फळे, खडीसाखर अथवा गूळ ठेवावा.

पूजा मांडल्यावर सर्व कुटुंबासमवेत श्री महालक्ष्मी व्रत कथा वाचावी. त्यानंतर आरती करावी. सर्वांना प्रसाद द्यावा. पूजेच्या संध्याकाळी लक्ष्मीला मिष्टान्नाचा नैवेद्य दाखवावा. त्यानंतर भोजन करावे. यादिवशी पूजा करणाऱ्या व्यक्तीने उपवास करावा. दुध आणि फळांचे सेवन करावे, घरात मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करावा.

दुसरे दिवशी सकाळी लवकर उठून पूजा विसर्जित करावी. कलशातील पाणी तुळशीस घालावे. तिला हळदी-कुंकू वाहून नमस्कार करावा. दर गुरुवारी नेमाने केल्या जाणाऱ्या या पुजेचे शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले जाते. या दिवशी सवाष्णींना हळदीकुंकू, फळे देऊन इतर वाण लुटले जाते.

जे कुणी श्री महालक्ष्मी-व्रत श्रद्धेने आणि मनोभावे करतील, त्यांना श्रीमहालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल. पण श्रीमंती आल्यावरसुद्धा माणसाने उतू नये, नित्य नेमाने श्रीमहालक्ष्मी व्रत करावे, देवीचे मनन-चिंतन करावे; म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील; तुमची कामना पूर्ण करील.