कोरोना व्हायरस (Coronavirus) च्या जागतिक आरोग्य संकटाने जगभरातील अनेक देशांना जेरीस आणले. वाढता कोरोना बाधितांचा आकडा, मृतांची संख्या यामुळे जगभर हाहाकार माजला. कोरोना व्हायरस संसर्गावर लस किंवा औषध उपलब्ध नसल्याने यावर नियंत्रण मिळवणे कठीण आहे. त्यामुळे संसर्ग आटोक्यात ठेवण्यासाठी कॉन्टॅट ट्रेसिंगचा पर्याय निवडण्यात आला आहे. भारतासाराख्या प्रचंड लोकसंख्येच्या देशात कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखणे तसे अवघड होते. मात्र टेस्ट (Test), ट्रेस (Trace) आणि ट्रिट (Treat) या त्रिसुत्रीच्या आधारे कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळण्यात आले. परिणामी परिस्थिती अधिक बिकट झाली नाही. पण या त्रिसुत्रीतील ट्रेस म्हणजे नेमके काय? किंवा कोरोना व्हायरस संकट काळ सुरु झाल्यापासून तुम्ही कॉन्टॅक्ट ट्रेसिंग (Contact Tracing) हा शब्द ऐकला असेल. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग म्हणजे नेमके काय? जाणून घेऊया...
कॉन्टॅक्ट ट्रेसिंग म्हणजे कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेणे. त्यामुळे ती व्यक्ती संसर्ग इतरांपर्यंत पसरवणार नाही. परिणामी कोविड-19 चा संसर्ग आटोक्यात आणण्यास मदत होईल. मात्र ही प्रक्रीया तितकीशी सोपी नाही. (कोविड-19 'Gargle and Spit' टेस्ट म्हणजे काय? जाणून घ्या चाचणीच्या या पद्धतीबद्दल सविस्तर)
एखाद्या व्यक्तीची कोविड-19 चाचणी पॉझिटीव्ह आल्यानंतर कॉन्टॅक्ट ट्रेसर त्या व्यक्तीशी संपर्क साधतो आणि संबंधित व्यक्ती कुठे, कुठे गेली होती, कोणा-कोणाला भेटली याची चौकशी करतो. त्यानंतर जवळून संबंध (Close Contact) आलेल्या किंवा 6 फूटापेक्षा कमी अंतरावर असलेल्या कमीत कमी 10 मिनिटे संबंध आलेल्या व्यक्तींची माहिती घेतली जाते. या व्यक्तींना सेल्फ आयसोलेशन मध्ये जाण्याचा सल्ला दिला जातो. तसंच काही लक्षणं दिसतात का, याचा अंदाज घेऊन गरज असल्यास टेस्ट करण्यास सांगितले जाते. परंतु, ज्या व्यक्तींमध्ये लक्षणे दिसून येतात. त्यांची टेस्ट तर केलीच जाते. पण पुन्हा कॉन्टॅट ट्रेसिंगची प्रक्रीया सुरु होते.
जगभरात वेगवेगळ्या पद्धतीने कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची प्रक्रीया केली जाते. मात्र कौटुंबिक समारंभ, मित्रांच्या पार्ट्या, बार, रेस्टोरन्ट मध्ये एकत्र जमलेल्यांचे कॉन्टॅट ट्रेसिंग काहीसे अवघड होते.
कोरोना व्हायरस लॉकडाऊन संपला असून आता अनेक देशांमध्ये अनलॉकिंगला सुरुवात झाली आहे. जनजीवन पूर्वपदावर येत असताना कोविड-19 चा धोका टाळण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने खबरदारी घेतली जात आहे.