Mangoes (Photo Credits: Unsplash)

तसा कोणालाही फारसा न आवडणारा ऋतू म्हणजे 'उन्हाळा'. मात्र केवळ एका फळासाठी या ऋतूची सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतात. ते फळ म्हणजे फळांचा राजा 'आंबा' (Mango). नुसतं नाव ऐकूनच अनेकांच्या तोंडाला पाणी आले असेल. मात्र ख-या हापूस आंब्याची खरी चव चाखायची असेल तर त्यासाठी चांगला ऋतू म्हणजे उन्हाळाच. हा आंब्याचा सीजन असल्यामुळे आंबाप्रेमी देखील मनमुराद या फळावर ताव मारतात. मात्र अति प्रमाणात आंब्याचे सेवन केले तर शरीराला घातक ठरू शकते. तसं पाहायला गेलं तर सीजनल फ्रुट त्या त्या सीजनला खाल्लेले कधी उत्तम. मात्र त्याचा अतिरेक होणार नाही याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे.

त्यासाठी आंबा खाताना काही ठराविक गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. केशरी, पिवळ्या रंगाचा आंबा बघून आपला जिभेवरचा ताबा राहत नाही हे जितकं खरं आहे तितकंच हे फळ खाताना काही ठराविक गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. नाहीतर तुमच्या शरीरावर त्याचा विपरित परिणाम होऊ शकतो.हेदेखील वाचा- Health Benefits Of Dry fruits: चांगल्या आरोग्यासाठी 'हे' ड्रायफ्रुइट्स आहेत सर्वात प्रभावी; जाणून घ्या फायदे 

आंबा खाताना 'या' गोष्टींच्या घ्या काळजी:

1. आंबा खाण्यापूर्वी तो किमान अर्धा तास आधी थंड पाण्यात भिजत ठेवावा ज्यामुळे त्यातील उष्णता कमी होते आणि तो पचन्यास जड जात नाही. सालीसकट आंबा खाणेही शरीरासाठी चांगले असते.

2. आंबा कापण्यापूर्वी त्याला कुठे बारीक छिद्र आहे की नाही ते तपासावे. तसे असल्यास समजावे की आंब्याला किड लागली आहे आणि तो खाण्यायोग्य नाही हे समजावे. असे फळ खाल्ल्यास तुम्हाला पोटाचे विकार होऊ शकतात.

3. जेवणाआधी अथवा नंतर आंबा खाणे शक्यतो टाळा. यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते.

4. ज्यांची पचनक्रिया फारशी चांगली नाही, त्या लोकांनी आंब्याचे अतिसेवन टाळावे.

5. आंब्याच्या अतिसेवनाने अतिसार वा जुलाब या समस्या उद्भवू शकतात.

6. आंबा हे फळ उष्ण असल्याने शरीरावर पुरळ येणे वा एलर्जी होण्याची शक्यता असते.

या सर्व गोष्टींची काळजी घेतलात तर तुम्ही उन्हाळ्यात आंब्यावर मनसोक्त ताव मारू शकता. मधुमेह असणारे देखील उन्हाळ्यात आंबे खाऊ शकतात. मात्र त्यासाठी तुमच्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घेणे फार गरजेचे आहे.

(सूचना: वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारित आहे. यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे. लेटेस्टली मराठी त्या मजकूराची पुष्टी करत नाही.)