पुण्यात बुधवारी गुइलेन-बॅरे सिंड्रोम (Guillain-Barré Syndrome) या इम्युनोलॉजिकल नर्व्ह डिसऑर्डरचे 35 नवीन संशयित रुग्ण आढळले, ज्यामुळे इथल्या एकूण रुग्णांची संख्या 59 वर पोहोचली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. पुणे महानगरपालिकेने (PMC) आजाराबाबत गुरुवारपासून सर्वेक्षण सुरू करण्यासाठी 100 टीम तयार केल्या आहेत. सिंहगड रोडलगतच्या बाधित भागात ही टीम लवकरच साथीच्या रोगांचे सर्वेक्षण सुरू करतील. सर्वेक्षणात नांदेड शहर, खडकवासला आणि धायरी सारख्या भागातील 2.5 लाखांहून अधिक रहिवाशांवर लक्ष केंद्रित केले जाईल. दूषित पाणी आणि अन्न यांच्याशी निगडीत इम्युनोलॉजिकल मज्जातंतूचा विकार असलेल्या गुइलेन-बॅरे सिंड्रोमच्या प्रकोपामुळे पुण्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या परिस्थितीला पुणे महापालिला जबाबदार ठरवले जात असून, त्यांच्यावर सुरक्षित पाणी पुरवठा न करण्याचे आरोप केले जात आहेत.
आम आम आदमी पार्टीच्या पुणे युनिटनेही महापालिकेवर टीका केली आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस (SP) पक्षाचे नेते शरद पवार यांनी महापालिकेला अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची विनंती केली आहे. माहितीनुसार, सर्वाधिक रुग्ण सिंहगड रस्ता, धायरी, किरकटवाडी आणि आसपासच्या भागांमधून आहेत. या रुग्णांना दिनानाथ मंगेशकर रुग्णालय, काशिबाई नवले रुग्णालय, पुणे रुग्णालय, भारती रुग्णालय, अंकुरा रुग्णालय आणि साह्याद्री रुग्णालयात दाखल केले आहे.
पाणी आणि अन्नाच्या दूषिततेला या गुइलेन-बॅरे सिंड्रोमच्या प्रकोपाशी जोडले गेले आहे. महापालिका या रुग्णांच्या गावातील पाणी आणि अन्नाची तपासणी करत आहे, ज्यामुळे विषाणूंच्या प्रसाराचे स्रोत शोधले जात आहेत. उल्लेखनीय म्हणजे, सिंहगड रोडजवळील धायरी, किरकटवाडी आणि खडकवासला यासारख्या अनेक भागांना दोन वर्षांपूर्वी पीएमसीमध्ये विलीन होऊनही पुरेसे पाणी मिळत नाही. या भागांना पीएमसीकडून प्रक्रिया केलेले पाणी मिळण्याऐवजी ग्रामपंचायतीकडून पाणी मिळते. (हेही वाचा: Fast Foods Are Shortening Lifespan: कोकपासून हॉट डॉगपर्यंत, अनेक अल्ट्रा-प्रोसेस्ड खाद्यपदार्थ तुमचे आयुष्य कमी करू शकतात, संशोधनात खुलासा)
गुइलेन-बॅरे सिंड्रोमची लक्षणे-
पायांमध्ये अशक्तपणा
अर्धांगवायूमुळे पाय, हात किंवा चेहऱ्याच्या स्नायूंवर परिणाम होऊ शकतो.
एक तृतीयांश प्रकरणांमध्ये श्वासोच्छवासावर परिणाम होऊ शकतो.
गंभीर प्रकरणांमुळे बोलणे आणि गिळणे प्रभावित होऊ शकते.
गंभीर प्रकरणांसाठी गहन काळजी आवश्यक असू शकते.
गुंतागुंतांमध्ये श्वसनक्रिया बंद पडणे किंवा हृदयविकाराचा समावेश असू शकतो.
गुइलेन-बॅरे सिंड्रोमचे कारण-
तज्ञांच्या मते, गुइलेन-बॅरे सिंड्रोमचे नेमके कारण माहित नाही, पण जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, बहुतेक प्रकरणे जंतुसंवेदनशील जीवाणू किंवा विषाणूंच्या संसर्गानंतर होतात. परिणामी, शरीरावरच रोगप्रतिकारक शक्तीचा हल्ला होतो. गुइलेन-बॅरे सिंड्रोम होण्याचे एक मुख्य कारण म्हणजे कॅम्पायलोबॅक्टेर जेज्युनी या जीवाणूचा संसर्ग, ज्यामुळे मळमळ, उलट्या आणि अतिसार यांसारख्या लक्षणांसह गॅस्ट्रोएन्टेरिटिस होतो. कधी कधी, काही लसीही गुइलेन-बॅरे सिंड्रोमच्या जोखमीचे कारण होऊ शकतात, पण हे अत्यंत दुर्मिळ आहे.