ऑक्टोबर हीट (Photo Credits: PTI)

पावसाळा संपल्यानंतर सुरू होणारी 'ऑक्टोबर हीट' सार्‍यांनाच नकोशी वाटते. वातावरणात होत असलेल्या बदलामुळे ऋतूचक्र बदलते. या दरम्यानच्या काळात सूर्य हळूहळू दक्षिणेकडे सरकतो परिणामी वातावरणात उष्णता वाढते. हिवाळा सुरू होण्यापूर्वी तापलेलं हे वातावरण म्हणजे 'ऑक्टोबर हीट'. प्रखर होणारी सूर्याची किरण या दिवसामध्ये अनेक आजारांचा धोका वाढवतात. सर्दी, खोकला, ताप, इंफेक्शन, डीहायड्रेशन अशा समस्या ऑक्टोबर हीटसोबत वाढतात. म्हणूनच त्यावर मात करण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेतल्यास ऑक्टोबर हीट सुसह्य होण्यास मदत होते.

SL Raheja Hospital चे फिजिशिएशन डॉ. परितोष बगल यांनी दिलेला हा सल्ला नक्कीच तुमच्या फायद्याचा ठरणार आहे..

1.डीहायड्रेशन -

वाढत्या उन्हात फिरल्याने शरीरातील पाण्याचा अंश कमी होतो. त्यामुळे मुबलक आणि ठराविक वेळेने पाणी पिणं आवश्यक आहे. पाण्यासोबतच द्रव स्वरूपातील पदार्थ, फळं खाण्याची सवय ठेवा. यामुळे पाण्यासोबतच शरीरात नैसर्गिक स्वरूपात साखरही जात असल्याने शरीरात ग्लुकोजचं प्रमाण टिकून राहण्यास मदत होते. ऋतूप्रमाणे बाजारात मिळाणारी फळं आहारात खावीत.

2.घामापासून दूर रहा -

सतत घाम येणार्‍यांनी ऑक्टोबर हीटमध्ये थोडी विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. घाम येत असल्यास पुरेशी न घेतल्याने स्किन इंफेक्शनचा धोका वाढतो. खाज येणे, रॅशेज येणे हा त्रास वाढतो. रात्री अ‍ॅन्टीपर्सिंटंट लावल्याने बर्‍याच प्रमाणात त्रास आटोक्यात राहण्यास मदत होते.

3. स्विमिंग -

स्विमिंग हा एक उत्तम व्यायामप्रकार आहे. यामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते सोबतच शरीराचं तापमान थंड ठेवण्यास मदत होते. ऑक्टोबर हीटचा दुष्परिणाम टाळण्यासाठी किमान दोनदा आंघोळ करा.

4. थंड पदार्थांचे सेवन

शरीरात नैसर्गिकरित्या थंडावा रहावा म्हणून आहारात बदल करा. काकडी, दही, आंबट -गोड फळांचा रस घ्यावा. अति मसालेदार, तेलकट पदार्थ टाळा.

5.सुटसुटीत कपडे निवडा

सुती आणि हलक्या फुलक्या कपड्यांची निवड करा. प्रामुख्याने काळा किंवा गडद रंगाचे कपडे टाळा. अशा रंगामध्ये उष्णता अधिक शोषली जाते. परिणामी अधिकच गरम वाटते.

6. उन्हात फिरणं टाळा

दिवसा गरज असेल तरच बाहेर पडा. 12-4 या वेळेत उन्ह प्रखर असते. या वेळेत फिरणं टाळा. उन्हं कोवळी किंवा सौम्य झाल्यानंतर बाहेर पडा. तसेच बाहेर पडल्यापूर्वी किमान अर्धा तास आधी युव्ही रेपासून संरक्षण करणार्‍या सनस्क्रिन क्रिमचा वापर करा. यामुळे त्वचा काळवंडण्याचा, त्वचेला त्रास होण्याचा धोका कमी होतो.