National Ayurveda Day 2019: धनत्रयोदशी दिवशी 'राष्ट्रीय आयुर्वेद दिवस' साजरा करण्याचं महत्त्व
Dhanteras 2019 (Photo Credits: Wikimedia Commons and PTI)

Dhanvantari Jayanti 2019:  राष्ट्रीय आयुर्वेद दिवस मागील काही वर्षांपासून धन्वंतरी जयंती म्हणजेच धनतेरसच्या (Dhanteras) दिवशी साजरा केला जात आहे. 2016 सालपासून राष्ट्रीय आयुर्वेद दिवस (National Ayurveda Day) साजरा करण्यास सुरूवात झाली आहे. यंदा 25 ऑक्टोबर दिवशी धनतेरस असल्याने राष्ट्रीय आयुर्वेद दिवस साजरा केला जातो. भारतीय परंपरेनुसार आयुर्वेद हा चौथा वेद आहे. आजही आरोग्य शास्त्र आणि वैद्य शास्त्र मध्ये आयुर्वेद उपचार पद्धती वापरली जाते. धनत्रयोदशी दिवशी धन्वंतरी पूजन करण्याची प्रथा आहे. धन्वंतरी (Dhanvantari) ही आरोग्य शास्त्राची देवता आहे. त्यामुळे देशा-परदेशात आयुर्वेदाला चालना देण्यासाठी राष्ट्रीय आयुर्वेद दिवस साजरा केला जातो.

धनतेरस दिवशी राष्ट्रीय आयुर्वेद दिवस का साजरा केला जातो?

राष्ट्रीय आयुर्वेद दिवस हा दरवर्षी धनतेरसच्या मुहूर्तावर साजरा केला जातो. हिंदू पौराणिक मान्यतेनुसार, धन्वंतरीची उत्पत्ती समुद्रमंथनात झाली. समुद्र मंथनातून बाहेर पडताना त्यांच्या हातात कलश होता. त्यामुळे धन्वंतरी जयंती हा दिवाळीपूर्वी दोन दिवस आधी साजरा केला जातो. भारत सरकार कडून धन्वंतरी जयंती हा धनतेरस दिवशी साजरा केला जाणार सण राष्ट्रीय आयुर्वेद दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे.

भगवान धन्वंतरी कोण होते?

भगवान धन्वंतरी हे भगावान विष्णूचे एक रूप होते. त्यांच्या चार हातामध्ये चक्र, शंख, जळवा आणि अमृत कलश होते. धन्वंतरीच्या हातातील कलश पितळ्याचा होता. त्यामुळे अनेकजण नियमित वापरामध्ये पितळ्याचा वापर करतात. अनेक आजारांवर आयुर्वेदामध्ये अचूक उपचारपद्धती वापरली आहे.

आयुर्वेद ही प्राचीन असली तरीही प्रभावी उपचार पद्धती आहे. त्याचा अधिक परिणामकारक करणं गरजेचे आहे. मात्र त्यासाठी आयुर्वेदाबाबत असलेले समज- गैरसमज दूर करणं आवश्यक आहे. तसेच आयुर्वेदीक उपचार पद्धती निवडण्याआधी वैद्यांचा सल्ला नक्की घ्यावा.