Mumbai Healthcare Facilities: गेल्या सहा वर्षांत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) आरोग्य बजेटमध्ये (Health Budget) 98% ने वाढ झाली आहे, तर बीएमसीच्या प्राथमिक आरोग्य सुविधांमधील रिक्त जागा गेल्या दशकात तीन पटीने वाढल्या आहेत, प्रजा फाऊंडेशनच्या ताज्या आरोग्य अहवालात ही बाब समोर आली आहे. अहवालात असेही अधोरेखित करण्यात आले आहे की, मुंबईत 313 सार्वजनिक दवाखाने आहेत जे प्रमाण विकास आराखड्यांमधील निकषांनुसार आवश्यक संख्येपेक्षा 63% कमी आहेत. गुरुवारी प्रजा फाऊंडेशन या गैर-सरकारी संस्थेने 'मुंबईतील आरोग्य समस्यांच्या स्थितीचा अहवाल' आरोग्य अहवाल प्रसिद्ध केला.
बीएमसीचे आरोग्य बजेट 2018-19 मधील 3,637 कोटी रुपयांवरून 2024-25 मध्ये 7,191 कोटी रुपयांपर्यंत 98% ने वाढले आहे. मात्र, इतका निधी असूनही बीएमसीच्या आरोग्य सुविधांमध्ये पायाभूत सुविधांची कमतरता आहे, ज्यामुळे नागरिकांना योग्य उपचार मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत. अर्थसंकल्प आणि पायाभूत सुविधांमधील अंतर कर्मचाऱ्यांच्या कमतरतेबद्दलच्या अहवालाच्या निष्कर्षांमध्ये दिसून आले आहे. त्यानुसार वैद्यकीय, पॅरा-मेडिकल आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या आतापर्यंतच्या सर्वाधिक 37% रिक्त जागा असल्याचे दिसून आले आहे.
अहवालानुसार, मुंबईतील एकाही महानगरपालिकेच्या प्रभागाने प्रत्येक 15,000 लोकसंख्येमागे एका सार्वजनिक दवाखान्याचे, URDPFI चे निकष पूर्ण केले नाहीत. याउलट, मुंबईत 2023 पर्यंत केवळ 313 दवाखाने होते, जे प्रमाण 1.25 कोटी लोकसंख्येसाठी आवश्यक असलेल्या 838 दवाखान्यांपेक्षा 63% कमी आहे. यासह 191 सार्वजनिक दवाखान्यांपैकी फक्त 6 दवाखाने आठ तासांसाठी सुरु आहेत, तर 181 सात तास सुरू आहेत, 194 हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सात तास सुरू असून त्यापैकी केवळ 13 दवाखाने 14 तास सुरू आहेत.
अहवालात मुंबईकरांमधील प्रमुख आजारांवरही प्रकाश टाकण्यात आला आहे, ज्यात एकूण प्रकरणांपैकी 36% अतिसार, क्षयरोग 15%, उच्च रक्तदाब 14%, मधुमेह 14% आणि डेंग्यू 5% आहे. उल्लेखनीय म्हणजे, 2014 ते 2023 पर्यंत हिपॅटायटीस सीच्या रुग्णांमध्ये 264% वाढ झाली आहे, तर कॉलराच्या रुग्णांमध्ये 200% वाढ झाली आहे. मधुमेह हा सर्वात प्राणघातक आजार म्हणून समोर आला आणि 11% मृत्यू त्याच्याशी संबंधित आहेत. मुंबईकरांमधील मधुमेहाच्या रुग्णांमध्ये 2014 मधील 2,428 प्रकरणांवरून 2022 मध्ये 14,207 प्रकरणांमध्ये 485% वाढ झाली आहे. मृत्यूच्या कारणांमध्ये श्वसनाचे आजार, क्षयरोग, उच्च रक्तदाब आणि कोविड-19 हे प्रमुख कारण होते. प्रजा फाऊंडेशनचे सीईओ मिलिंद म्हस्के म्हणाले, मधुमेह सारखे जीवनशैलीचे आजार मुंबईतील मृत्यूचे प्रमुख कारण बनले आहेत. (हेही वाचा; Mumbai Post-Diwali Pollution: दिवाळीनंतरच्या प्रदूषणामुळे मुंबईतील रुग्णालयांमध्ये श्वसन समस्यासंबंधी रुग्णांमध्ये वाढ- Reports)
गेल्या काही वर्षांत मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेत सातत्याने घसरण होत असल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. 2020 नंतर, मुंबईची हवेची गुणवत्ता समाधानकारक स्तरावरून मध्यम पातळीवर गेली आणि 2023 मध्ये, AQI चांगल्या श्रेणीमध्ये कोणत्याही महिन्यात नोंदविला गेला नाही. अहवालात असेही अधोरेखित करण्यात आले आहे की, दरवर्षी 11,000 हून अधिक लोक मोठ्या श्वसन रोगांमुळे मृत्युमुखी पडत आहेत. दरम्यान, गेल्या तीन वर्षांत, महापालिका निवडणुका झाल्या नाहीत आणि बीएमसी निवडून आलेल्या प्रतिनिधींशिवाय काम करत आहे. परिणामी, आरोग्याच्या महत्त्वाच्या समस्या सोडवण्यासाठी आरोग्य समितीची स्थापना करण्यात आलेली नाही.