प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit : Youtube)

मधुमेहाचा त्रास असणार्‍यांमध्ये रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवण्याचं मोठं आव्हान असतं. यासाठी आवडीच्या अनेक पदार्थांना थोडी मुरड घालावी लागते. परंतू संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप घेतल्यास रक्तातील साखर नियंत्रणामध्ये ठेवणं शक्य आहे. मधुमेहींच्या आहारामध्ये प्रथिनयुक्त पदार्थ अधिक आणि साखरेचे पदार्थ कमी ठेवणं आवश्यक आहे. त्यामुळे महुमेहींसाठी सुपरफूड्स असलेले हे काही पदार्थ तुमच्यासाठी फायद्याचे ठरू शकतात. परंतू या पदार्थांचे सेवन नियंत्रणामध्ये करणं आवश्यक आहे.  नक्की वाचा: Type 1 Diabetes Study: मुलींच्या तुलनेत मुलांना 'टाइप 1 मधुमेह' होण्याचा धोका जास्त; संशोधनातून माहिती उघड. 

मधुमेहींसाठी सुपरफूड्स कोणती?

कारलं-

कारलं पाहून अनेकजण नाकं मुरडत असतील पण मधुमेहींसाठी कारलं खाणं गुणकारी आहे. कारल्याच्या सेवनाने रक्तातील साखरेच प्रमाण संतुलित ठेवण्यास मदत होते. इंसुलिन सेंसिटीव्हिटी सुधारते.

दालचिनी-

दालचिनी हा गरम मसाल्यांपैकी एक पदार्थ आहे. भारतीय स्वयंपाक घरांमध्ये हा पदार्थ हमखास आढळतो. तिखट, उग्र चवीची दालचिनी ही रक्तात ग्लुकोज प्रमाण नियंत्रणात ठेवते सोबतच इन्सुलिन अ‍ॅक्टिव्हिटी सुधारण्यास मदत करते.

हिरव्या भाज्या -

मधुमेहींच्या शरीरात ग्लुकोजचं प्रमाण नियंत्रणामध्ये ठेवण्यामध्ये आहार योग्य असणं आवश्यक आहे. यामध्ये सर्वसमावेशक पदार्थांमध्ये हिरव्या भाज्यांचाही समावेश आहे. हिरव्या भाज्यांमध्ये कार्ब्सचं प्रमाण कमी असतं तर मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात असल्याने रक्तातील साखर नियंत्रणामध्ये राहते.

जांभूळ-

जांभूळ हे एक सीझनल फळ आहे. पूर्वी अनेक घरांजवळ सहज मोठी जांभळाची झाडं आढळत असे पण आता जेव्हा बाजारात जांभूळ उपलब्ध होते तेव्हा त्याचं सेवन करणं आवश्यक आहे. जांभळामध्ये नैसर्गिकरित्या इन्सुलिनचं काम सुधारण्याची क्षमता आहे.

अळशी -

अळशी मध्येही ओमेगा 3, फायबर यांचा समावेश असल्याने रक्तातील साखर नियंत्रणामध्ये राहण्यास मदत होते.

ओट्स -

आजकाल नाश्त्यामध्ये झटपट चविष्ट पद्धतीने बनवता येऊ शकणारा एक पदार्थ म्हणजे ओट्स आहे. घाईत घराबाहेर पडणार्‍यांना ओट्स खाणं सोयीचं वाटतं. ओट्स मध्ये बीटा ग्लूकन फायबर आहे. अचानक रक्तात साखर वाढण्याचा धोका ओट्सच्या सेवनाने कमी असतो.

मेथी -

मेथी देखील कडू असते पण मधुमेहींसाठी गुणकारी आहे. उत्तम सोल्युबल फायबर्सचा पर्याय आहे. रक्तात साखर शोषून घेण्याची क्रिया मेथीच्या सेवनाने कमी होते.

दरम्यान मधुमेहींनी कोणताही पदार्थ हा प्रमाणात खाण्यातचं हित आहे. त्यामुळे संतुलित आहारासाठी डॉक्टर किंवा आहारतज्ञांकडून पोर्शन कंट्रोल जाणून घेणं आवश्यक आहे. त्यानुसार चौकस आहाराचं आयोजन करणं शक्य आहे.

Disclaimer: लेखात नमूद केलेले सल्ला आणि सूचना केवळ सामान्य माहितीसाठी आहे आणि हा वैद्यकीय सल्ला समजू नये. तुम्हाला काही प्रश्न किंवा समस्या असल्यास नेहमीच तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.