लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांसाठी योग हे उपयुक्त ठरते. योग करण्यासाठी किंवा त्याचे फायदे मिळवण्यासाठी वय, लिंग यांचे बंधन नसते. नियमित योगसाधना करणाऱ्या प्रत्येकाला त्याचे फायदे मिळतात. शारीरिक आरोग्यासोबत मानसिक स्वास्थ्य राखण्याचे कामही योग अत्यंत उत्तम करतं. त्यामुळे लहानपणापासून योगसाधनेची सवय लावली तर मुलांना व्यायामाची गोडी लागेल. तसंच शरीराची लवचिकता वाढेल, उंची वाढण्यास मदत होईल. एकाग्रता, स्मरणशक्ती वाढेल. 21 जून रोजी जागतिक योग दिन जगभरात साजरा केला जाईल. यंदा कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे योगदिनाला साधे स्वरुप प्राप्त झाले असले तरी घरच्या घरी योगसाधना करुन तुम्ही योगदिन साजरा करु शकता. तर यंदाच्या योगदिनानिमित्त लहान मुलांसाठी योगसाधनेचे महत्व काय? योगसाधनेला सुरुवात करण्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, जाणून घेऊया...
लहान मुलांना मिळणारे योगसाधनेचे फायदे:
# नियमित योगसाधना केल्यामुळे उभे राहण्याची, बसण्याची स्थिती योग्य राहते.
# अभ्यासात एकाग्रता नसणे ही मुलांमध्ये आढळणारी सामान्य समस्या. योगसाधनेमुळे एकाग्रता वाढण्यास नक्कीच मदत होते.
# नियमित योगसाधना, ध्यान यामुळे स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.
# तसंच लहान मुलांची रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यासाठी योगा करणे फायदेशीर ठरते.
# योगसाधनेमुळे स्टॅमिना वाढतो. तसंच बॅलन्स विचार करण्याची प्रवृत्ती वाढीस लागते.
लहान मुले योगसाधनेला सुरुवात करण्यापूर्वी कोणती काळजी घ्याल?
हळूहळू सुरुवात करा:
सुरुवातीला सोप्या आसनांपासून सुरुवात करा. योग्य टेक्निकसह आसने करा. त्यामुळे कोणताही त्रास होणार नाही. आसनाच्या अंतिम स्थितीत जितका वेळ राहणे शक्य आहे. तितकाच वेळ रहा. कोणताही अट्टाहास करु नका.
अंतिम स्थिती योग्य आहे की नाही ते तपासा:
सुरुवातीपासूनच योग्य पद्धतीने आसने केल्याने शरीराला तसे वळणच लागते. त्यामुळे आसनाची अंतिम स्थिती शक्यतो चुकत नाही. त्यामुळे सुरुवातीला प्रशिक्षित ट्रेनरच्या देखरेखीखालीच आसने करा.
श्वासाकडे लक्ष ठेवा:
आसने करताना श्वासाकडे लक्ष ठेवा. श्वास कधी घ्यायाचा कधी सोडायचा हे नीट समजून घ्या.
आसने पूर्ण करा:
काही आसने दोन्ही बाजूने करायची असल्याने केवळ एका बाजूने केल्यानंतर सोडून देऊ नका. दुसऱ्या बाजूने देखील करुन आसनाचा परिघ पूर्ण करा.
नवी आसने शिका:
एकदा साधी सोपी आसने नीट जमू लागली की नवी आसने शिका. त्यातून नक्कीच आनंद मिळेल.
या चूका टाळा:
# आसनाची अंतिम स्थिती अचूक येण्यासाठी कोणताही अट्टाहास करु नका. त्यासाठी कोणत्याही अवयवावर अधिक ताण देऊ नका. नियमित सरावाने योग्य अंतिम स्थिती धारण करणे सहज शक्य होईल.
# तसंच योगसाधना करताना शरीराल कोठेही जर्क बसणार नाही. याची काळजी घ्या. घाईघाईने कोणतेही आसन करु नका.
लहानपणापासूनच मुलांना योगसाधनेची सवय लावली तर त्याचे शारीरिक स्वास्थ्य राखले जाईलच. पण त्याचबरोबर समतोल विचार करण्याकडे मुलांचा कल असेल. मुलांचा आत्मविश्वास वाढेल. त्यामुळे यंदाच्या योगदिन तुमच्या मुलांना योगसाधनेचे महत्त्व पटवून द्या आणि योग्य ट्रेनरच्या साहाय्याने योगसाधेला प्रारंभ करा. आजकाल योगाचे अनेक ऑनलाईन क्लासेसही उपलब्ध आहेत.