How to Use Sanitisers During Diwali 2020 Safely: दिवाळी दरम्यान हँड सॅनिटायझर्सचा वापर सुरक्षितरित्या कसा कराल? जाणून घ्या
Sanitisers use during Diwali 2020 (Photo Credits: Pixabay)

दिवाळी हा प्रकाशाचा सण. दिवे. कंदील, विद्युत रोषणाई, फटाक्यांची आतिषबाजी यामुळे सगळीकडे झगमगाट पाहायला मिळतो. घराची स्वच्छता, सजावट, फराळ बनवणे, एकत्र येणे या सगळ्यात एक प्रकारची मौज आहे. असा हा आनंदी, उत्साही सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. सणाची आतुरता प्रत्येकाच्या मनी आहेच. परंतु, कोरोना व्हायरसचे संकट विसरुन चालणार नाही. त्यामुळे हात धुत राहणे, सोशल डिस्टसिंगचा वापर करणे, मास्क घालणे यांसारख्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहेच. अनेकदा हँडवॉश, साबणाऐवजी हँट सॅनिटायझर्सचा वापर हात स्वच्छ केला जातो. मात्र दिवाळीच्या काळात हँड सॅनिटायझरचा वापर करताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. तसंच हँड सॅनिटायझर्स ज्वलनशील असल्याने ते योग्य जागी ठेवणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे दिवे, पेणत्या पेटवताना, फटाके लावताना हँड सॅनिटायझर्सचा वापर करु नका.

बहुतांश हँड सॅनिटायझर्स हे अल्कोहोलयुक्त असतात. त्यामुळे ते अतिसश ज्वलनशील असतात. त्यामुळे हँड सॅनिटायझरचा वापर करुन लगेचच दिवे लावणे धोक्याचे धरु शकते. त्याचबरोबर दिवाळीत घरात, घराबाहेर, गॅलरी, खिडकीत दिव्यांची आरास केली जाते. अशा वेळी सॅनिटायझर्स दिव्यांपासून दूर ठेवा. दरम्यान, यापूर्वी गणपतीत देखील आरती करताना हँड सॅनिटायझरचा वापर करताना विशेष काळजी घेण्यासंबंधित नागरिकांना सतर्क करण्यात आले होते. त्यानंतर आता दिवाळीच्या आनंदाला गालबोट लागू नये म्हणून खबरदारी घेणे गरजेचे आहे. (Eco Friendly Diwali 2020: शेणापासून बनवलेले दिवे, रांगोळी ते Green Firecrackers असा साजरा करू शकता यंदा कोरोनाच्या सावटाखाली सुरक्षित दीपोत्सव 2020!)

कोविड-19 संकटामुळे यंदाची दिवाळी अत्यंत साध्या पद्धतीने साजरी करण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे. त्यामुळे आपल्यापैकी अनेकजण घरातच दिवाळी साजरी कराल. त्यामुळे हात धुण्यासाठी साबण आणि हँडवॉशचा वापर करणे सोयीस्कर ठरेल.

# दिवे, पणत्या लावण्यापूर्वी हँड सॅनिटायझरचा वापर करु नका.

# फटाके फोडण्यापूर्वी हाताला सॅनिटायझर लावू नका.

# दिवाळीच्या काळात हात स्वच्छ करण्यासाठी शक्यतो साबण किंवा हँडवॉशचा वापर करा.

# दिवे, पणत्या यापासून सॅनिटायझर्सच्या बॉटल्स दूर ठेवा.

दिवाळीत विशेषत: संध्याकाळच्या वेळी दिव्यांची रोषणाई केली जाते. फोटो काढण्याचा उत्साह असतो. त्यामुळे सुरक्षिततेसाठी संध्याकाळच्या वेळी सॅनिटायझर्सच्या बॉटल्स आत ठेवून द्या. तसंच मुलं फटाके फोडण्यासाठी घराबाहेर पडणार असतील तर त्यांना सॅनिटायझरचा वापर करु देऊ नका. यंदाची दिवाळी आनंदी आणि सुरक्षित होण्यासाठी ही विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.