
बदलत्या वातावरणामुळे आजाकाल सर्दी, खोकल्याचा त्रास झपाट्याने वाढत आहे. अनेकांना सध्या महिनोंमहिने खोकल्याच्या उबळेने त्रास होत आहे. अशावेळेस वेळीच रूग्णांनी आवश्यक तपासणी करून घेणे गरजेचे आहे. सध्या 15 दिवसांहून अधिक काळ खोकला राहणं हे सामान्य होत चालले आहे. अनेकांना रात्री खोकल्याचा त्रास प्रामुख्याने जाणवतो. तुम्हांला कफाच्या खोकल्याचा त्रास होत असल्यास खडीसाखर चघळणं अत्यंत फायदेशीर आहे. खडीसाखर हा खोकल्यावरील रामबाण उपाय आहे.
खडीसाखर - आजीबाईच्या बटव्यातील रामबाण उपायांवर
हळूहळू वातावरणात गारवा वाढणार आहे. अशातच ऋतूमानात बदल झाल्याने अनेकांना झटकन सर्दी, खोकल्याचा त्रास जाणवतो. सर्दी खोकल्याच्या त्रासातून सुटका मिळवायची असेल तर वैद्यकीय उपचारांसोबतच खडीसाखर चघळा. यामुळे त्रास कमी होण्यास मदत होईल.
कसा कराल वापर ?
खडीसाखरेसोबत काळामिरी चघळणे फायदेशीर आहे. त्यामधील अॅन्टी बॅक्टेरियल गुणधर्म घशातील खवखव, कफ कमी करण्यास मदत करतात. खडीसाखर आणि काळामिरी समप्रमाणात घेऊन त्याची पूड बनवा. ही पूड चहामध्ये मिसळून किंवा काढ्यात मिसळून प्यायल्यास फायदा होतो. या मिश्रणामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासही मदत होते.
खडीसाखरेमुळे शरीरात थंडावा निर्माण होण्यासही मदत होते. साखरेच्या तुलनेत खडीसाखर चवीला थोडी उग्र असल्याने त्याचा वापर प्रमाणातच करावा.
साखर, खडीसाखर, गूळ हे गोडवा निर्माण करणारे घटक ऊसापासूनच बनवले जातात. त्यामुळे मधुमेहींनी आहारात त्याचा समावेश करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.