सध्या चीन (China) मधील कोरोना विषाणू (Coronavirus) मुळे निर्माण झालेली परिस्थिती नियंत्रणात आली आहे. मात्र इतर देश कोरोना विषाणूशी झगडत आहेत. अशात एक दिलासादायक बातमी समोर आहे. चीनमध्ये संक्रमित झालेल्या पाच गंभीर रूग्णांवर, पूर्वी कोरोना व्हायरसची शिकार झालेल्या रुग्णांच्या रक्ताद्वारे उपचार केले गेले व आता हे रुग्ण ठीक झाल्याचा दावा चीनने केला आहे. कोरोना बरा करण्यासाठी उपचार करण्याची ही पद्धत चायनीज रूग्णालयात अवलंबली गेली. आता ज्या रूग्णांवर ही पद्धत अवलंबली त्यांची प्रकृती सुधारली असून आणि त्यांना घरी पाठविण्यात आले.
डेलीमेल वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, या रुग्णांवर उपचार करणार्या डॉक्टरांचा असा विश्वास आहे की, जुन्या रुग्णांच्या रक्ताची उपचार पद्धत वापरून अनेक नवीन लोकांना बरे केले जाऊ शकते. शेनझेन थर्ड पीपल्स हॉस्पिटलने 27 मार्च रोजी उपचारांच्या या पद्धतीचा अहवाल प्रकाशित केला. रूग्णालयाच्या व्यवस्थापनाने सांगितले की, जुन्या कोरोना रूग्णाच्या रक्ताने उपचार घेतलेले पाच रुग्ण 36 ते 73 वर्षांच्या दरम्यानचे आहेत.
शास्त्रज्ञ जुन्या रुग्णांच्या रक्ताने नवीन रूग्णांवर उपचार करण्याच्या तंत्राला कॉन्व्हॅलेसेंट प्लाझ्मा (Convalescent plasma) असे म्हणतात. यातून बरेच आजार बरे झाले आहेत. याद्वारे, जुन्या बरे झालेल्या रूग्णांचे रक्त नवीन रुग्णांच्या रक्तात टाकून रोगप्रतिकार शक्ती वाढविली जाते. या तंत्रामध्ये रक्ताच्या आत असलेल्या विषाणूशी लढण्यासाठी प्रतिपिंडे तयार केले जातात. या अँटीबॉडीज विषाणूंविरूद्ध लढतात किंवा विषाणूला दडपतात.
शेन्झेन थर्ड हॉस्पिटलमध्ये संसर्गजन्य रोगांच्या अभ्यासासाठी राष्ट्रीय क्लिनिकल रिसर्च सेंटर देखील आहे. रुग्णालयाचे उपसंचालक लियू यिंगजिया म्हणाले की, ‘आम्ही 30 जानेवारीपासून कोरोना व्हायरसचे बरे झालेले रुग्ण शोधत होतो. त्यांच्या रक्तामधून प्लाझ्मा काढून तो साठविला गेला. हॉस्पिटलमध्ये जेव्हा नवीन रुग्ण आले तेव्हा त्यांना हा प्लाझ्मा डोस देण्यात आला व आता हे नवीन रुग्ण बरे झाले आहेत.’ लियू यिंगजिया यांना विशास आहे की, चीनची ही पद्धती जगभर वापरली जाऊ शकते. (हेही वाचा: कोरोना विषाणूमुळे मनोरूग्णांच्या संख्येत 20 टक्क्यांनी वाढ; इंडियन सायकॅट्रिस्ट सोसायटीची माहिती)
जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) आरोग्य आणीबाणी कार्यक्रमाचे प्रमुख डॉ. माईक रायन यांनी, या रक्ताच्या उपचारांबद्दल चिनी रुग्णालयाचा दृष्टीकोन उत्तम असल्याचे सांगितले आहे. सध्या विषाणूशी लढा देण्यासाठी हे एक महत्वाचे पाऊल ठरू शकते असे ते म्हणाले. ह्यूस्टन मेथोडिस्ट हॉस्पिटलला अमेरिकन खाद्य आणि औषध प्रशासन (FDA) कडून, कोरोना व्हायरस रूग्णांच्या उपचारांसाठी प्लाझ्मा ट्रान्सफ्यूजनचा वापर करण्यास मान्यता मिळाली आहे.