थंडीच्या दिवसांत भारतातील सर्वात मोठा सण दिवाळी आनंदाने साजरा केला जातो. हिवाळ्यात जास्त भूक लागते त्यामुळे दिवाळीच्या काळातही अनेक गोडाधोडाच्या पदार्थांची रेलचेल असते. प्रत्येकजणच अशा पदार्थांवर ताव मारून हे पदार्थ एंजॉय करतो, याला अपवाद तो मधुमेह असणारी व्यक्ती. मधुमेहाच्या रुग्णांना गोड खाण्याची सक्त मनाई असते. त्यामुळे मनात असूनही हे रुग्ण कोणत्याच कार्यक्रमात गोड खाऊ शकत नाहीत. मात्र सध्या दिवाळीसारख्या उत्सवाच्या काळात बाजारात अनेक शुगर-फ्री मिठाई किंवा गोड पदार्थ उपलब्ध आहेत, ज्यांचा स्वाद तुम्ही आनंदाने घेऊ शकता. चला तर पाहूया आशा कोणत्या मिठाई आहेत ज्या या दिवाळीत तुमच्या आनंदात गोडपणा घेऊन येऊ शकतात. नक्की वाचा : दिवाळी फराळावर ताव मारण्यापूर्वी मधुमेहींनी 'या' टिप्स नक्की लक्षात ठेवा !
> शुगर-फ्री बेसन लाडू -
बेसन, तूप आणि मोठ्या प्रमाणात साखरेचा वापर करून बनवलेले बेसन लाडू कोणाला आवडत नाहीत. पण डायबेटीजचे रुग्ण फक्त दुरूनच या गोष्टीचा आस्वाद घेऊ शकतात. मात्र आता डायबेटीजच्या रुग्णांना डोळ्यासमोर ठेऊन अनेक कंपन्यांनी शुगर-फ्री बेसन लाडू बाजारात आणले आहेत. या लाडवात साखर अजिबात असत नाही, त्यामुळे कोणताही विचार न करता मधुमेही हे बेसन लाडू खाऊ शकतात.
> खजूराची वडी अथवा लाडू -
मधुमेह असलेल्या पेशंटसाठी मिठाईचा हा खूप चांगला पर्याय आहे. बदामासोबत गार्निश केलेले खजूर दिवाळी मिठाई म्हणून तुम्ही खाऊ शकता. खजूर आणि बदाम यांमुळे हा पदार्थ शरीरासाठीही पौष्टिक आहे. खजूर बारीक करून त्यात सुकामेवा मिक्स करून तुम्ही त्याचे लाडूही बनवू शकता.
> अंजीर बर्फी -
अंजीर आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे, अंजीर पचनक्रिया सुधारतो तसेच डायबेटीजला देखील नियंत्रित ठेवते. त्यामुळे या दिवाळीला तुम्ही अंजीर बर्फी नक्की ट्राय करू शकता. अंजीर बर्फीमध्ये रिफाइंड शुगर असत नाही.
> फिनी –
ही एक पारंपरिक राजस्थानी मिठाई आहे. मात्र सध्याच्या काळात ही मिठाई सर्वत्र उपलब्ध असते पीठ, तूप आणि साखरेपासून बनवलेल्या बनवलेली ही मिठाई सध्या शुगर-फ्री व्हर्जनमध्येही उपलब्ध आहे.
> दुधीचा हलवा –
दिवाळीत तुम्ही विविध प्रकारचे हलवे ट्राय करू शकता त्यातीलच एक पौष्टिक म्हणजे दुधीचा हलवा. छोटा चमचा तूप, दुधी, साय नसलेले दुध, वेलची पावडर आणि हवी असल्यार सुगर-फ्री साखर घालून तुम्ही हा हलवा बनवू शकता. याच पद्धतीने तुम्ही गाजराचा हलवा देखील पर्याय म्हणून वापरू शकता.