चुकवू नका सकाळचा नाश्ता, नाहीतर या 5 आजारांशी करावा लागेल सामना
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits pixabay)

साधारणपणे प्रत्येक व्यक्ती दिवसभरात 3-4 वेळा काही ना काही खात असते, ज्यामुळे तुमच्या शरीरातील पोषक तत्वे आणि एनर्जी टिकून राहते. मात्र सकाळची पहिली न्याहारी (ब्रेकफास्ट) ही आपल्या शरीरासाठी, आपल्या आरोग्यासाठी अतिशय महत्वाची असते. कारण सकाळच्या पहिल्या ब्रेकफास्ट मधूनच आपल्याला दिवसभर काम करण्यासाठी उर्जा प्राप्त होत असते. म्हणूनच सकाळचा नाश्ता हा कधीही टाळू नये.

मात्र अनेक लोक सकाळच्या कामाच्या, ऑफिसच्या, शाळा-कॉलेजच्या गडबडीत सकाळचा नाश्ता करत नाहीत किंवा असे अनेक लोक असतात ज्यांना सकाळचा नाश्ता करणे आवडतच नाही.

मात्र जर का तुम्हीही कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सकाळी नाश्ता करत नसाल तर त्याचा तुमच्या शरीरावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. तुमची ही सवय अनेक आजारांना निमंत्रणही देऊ शकते. चला पाहूया सकाळी नाश्ता न करण्याने तुम्हाला कोणत्या आजारांचा सामना करावा लागू शकतो.

1) रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे

सकाळी नाश्ता न करण्याने अथवा उपाशी राहिल्याने शरीरातील सेल्स डॅमेज होऊ शकतात. ज्यामुळे तुमची रोगप्रतिकार शक्ती कमी होऊन व्हायरस, बॅक्टेरिया यांमुळे होणाऱ्या रोगांचा खतरा वाढू शकतो. म्हणून रोज सकाळी पोट भरून नाश्ता करा ज्यामुळे रोगांशी लढण्याची शक्ती तुम्हाला प्राप्त होईल.

2) सुस्ती आणि थकवा जाणवणे

भलेही तुम्ही दुपारचे जेवण पोटभर घेत असाल, पण जर का तुम्ही सकाळचा नाश्ता करत नसाल तर दिवसभर तुम्हाला सुस्ती आणि थकवा जाणवू शकतो. सकाळचा वेळ हा शरीरासाठी आवश्यक असलेल्या पोषक तत्वांना शरीरामध्ये शोषून घेण्याचा उत्तम वेळ असतो. अशावेळी जर का तुम्ही सकाळचा नाश्ता करत नसाल तर पोषक तत्वांच्या आभावी तुम्हाला दिवसभर थकवा जाणवतो.

3) डोकेदुखीची समस्या उद्भवू शकते

सकाळी ब्रेकफास्ट न केल्याने तुमच्या शरीरातील साखरेची पातळी कमी होऊन डोकेदुखी आणि तणाव यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. साखरेची पातळी कमी होऊन शरीरामध्ये असे हार्मोन सक्रिय होतात जे तुमच्या डोकेदुखी आणि फटिगसाठी कारणीभूत ठरतात.

4) शरीराची जाडी वाढू शकते

बहुतेक लोक सकाळचा नाश्ता टाळून दिवसभरात कमी वेळा भरपूर जेवण करतात, मात्र असे केल्याने तुमच्या शरीरातील कॅलरींचे प्रमाण वाढून शरीरात अतिरिक्त चरबी जमा होऊ शकते. मात्र तुम्ही सकाळी पोटभरून नाश्ता केला आणि दिवसभर थोडे थोडे खाल्ले तर तुमची चयापचय प्रक्रिया व्यवस्थित होते. सकाळचा नाश्ता हा ‘फॅट कटर’ देखील असतो. म्हणूनच शरीरातील वाढत्या चरबीचे प्रमाण कमी करण्यासाठी सकाळचा नाश्ता फारच उपयोगी आहे.

5) टाईप 2 डायबेटीसचा त्रास                                                                                                              नुकत्याच झालेल्या एका रिसर्चनुसार जे लोक सकाळचा नाश्ता करत नाहीत त्यांना, जे लोक नाश्ता करतात त्यांच्यापेक्षा जास्त टाईप 2 डायबेटीस होण्याची शक्यता असते. सकाळचा नाश्ता टाळल्याने हृदयासंबंधी तक्रारीही उद्भवू शकतात.

म्हणूनच काहीही झाले तरी सकाळी पोटभर नाश्ता करूनच घराबाहेर पडा.