रक्तदानाबाबतच्या या  10 समज-गैरसमजांमुळे तुम्हीही  रक्तदान करत नाहीत का?
रक्तदान Photo Credits : Pixabay

रक्तदान हे महत्त्वाच्या दानांपैकी एक समजले जाते. मात्र आज 21 व्या शतकातही रक्तदानाबाबत समाजामध्ये पुरेशी सजकता नाही. परिणामी मोठ्या शस्त्रक्रिया, अपघातामध्ये योग्य वेळी पर्यायी रक्ताचा पुरवठा उपलब्ध न झाल्याने अनेकांना प्राण गममावे लागतात. रक्तदान आणि दात्यांबाबत समाजात सजगता वाढावी म्हणून फेसबूकपासून ते अगदी लहान रक्तपेढ्यांपर्यंतच सारेच प्रयत्नशील आहेत. केवळ काही गैरसमजांमुळे तुम्ही रक्तदानापासून दूर राहत असाल तर तुमच्या मनातील भीती आजच दूर करा आणि बिनधास्त रक्तदान करण्यासाठी पुढे या !

गैरसमज : रक्तदान करताना त्रास होतो

खरं काय ? : रक्तदानाच्या दरम्यान सूईचा वापर केला जातो. ती हातावर विशिष्ट रक्तवाहिनीजवळ टोचली जाते मात्र हा त्रास क्षणिक आणि माफक वेदना सहन करण्यासाठी असतो.

गैरसमज : रक्तदानानंतर त्रास होतो, थकवा येतो.

खरं काय ? : रक्तदानानंतर सर्रास त्रास होतो हा निव्वळ गैरसमज आहे. एका संशोधनानुसार, रक्तदान केल्यानंतर कार्डियोव्हसक्युलर आजारांचा धोका कमी होतो. शरीरात अतिप्रमाणात आयर्न साचून राहण्याचा धोका कमी होतो. रक्तदानापूर्वी दात्याची चाचणी केली जाते. ज्यामधून दुषित रक्ताची तपासणी, धोके, हिमोग्लोबिनचे प्रमाण हे पाहूनच रक्तदानाचा निर्णय घेतला जातो. रक्तदात्याचे हिमोग्लोबिन कमी असेल किंवा अन्य काही त्रास असल्यास त्यांचे रक्त स्वीकारले जात नाही किंवा त्यांना रक्तदान न करण्याचा सल्ला दिला जातो.

गैरसमज : रक्तदानानंतर दात्याच्या शरीरातील रक्त कमी होते.

खरं काय ? :  रक्तदान केल्याने शरीरात मूळीच त्याची कमतरता निर्माण होत नाही. रक्तदानानंतर 48 तासांत ती झीज भरून निघते. तुमचे आरोग्य उत्तम असल्यास आणि संतुलित आहार घेणार्‍या व्यक्ती दर तीन महिन्यातून एकदा म्हणजेच वर्षातून चार वेळेस रक्तदान करू शकतात.

गैरसमज: विशेष रक्तगट असणार्‍यांनाच प्रामुख्याने रक्ताची कमतरता भासते

खरं काय ? : शस्त्रक्रिया, अपघातानंतरच्या उपचारामध्ये रक्ताची गरज भासते. त्यामुळे विशेष रक्तागटासोबतच सामान्य रक्तगटाचीदेखील सर्वत्र रूग्णालयांमध्ये गरज भासते.

गैरसमज : रक्तदानानंतर दिवसभर आराम करावा लागतो

खरं काय ? : काही विशिष्ट गोष्टींचं भान ठेवल्यास रक्तदानानंतर अवघ्या काही तासात तुम्ही अगदी सामान्यपणे काम करू शकता.

रक्तदानानंतर 24 तासामध्ये मुबलक पाणी प्यावे. (किमान 10-12 ग्लास पाणी किंवा इतर द्रव्यपदार्थ )

रक्तदानानंतर पुढील 2-3 दिवस मद्यपान टाळा.

रक्तदानानंतर ताबडतोब पुढील 3-4 तास वाहन चालवणं,फार काळ उन्हांत राहणे, धुम्रपानाची सवय टाळा.

गैरसमज : रक्तदानानंतर लठ्ठपणा वाढतो.

खरं काय ? : रक्तदानामुळे थेट वजन वाढेल किंवा कमी होईल असे काही नसते. वजन हे तुमच्या लाईफस्टाईल आणि व्यायाम, आहारावर अवलंबून असते.

गैरसमज : उच्च रक्तदाबाचे रूग्ण रक्तदान करू शकत नाही.

खरं काय ? : रक्तदानाच्या वेळेस तुमचा रक्तदाब 180 systolic ते 100 diastolic पेक्षा कमी असल्यास तुम्ही रक्तदान करू शकता. काही वेळेस ही परवानगी तुम्ही घेत असलेल्या गोळ्यांवर अवलंबून असते.

गैरसमज : मधूमेही रक्तदान करू शकत नाही.

खरं काय ? : डॉक्टरांच्या मते, मधूमेहीदेखील रक्तदान करू शकतात. परंतू रक्तदानाच्या वेळेस तुमच्या रक्तातील साखर नियंत्रणामध्ये असणे आवश्यक आहे.

गैरसमज : रक्तदान केवळ तरुणांनी करावं

खरं काय ? : रक्तदान करण्यासाठी किमान वयाचे बंधन असले तरीही कमाल वयाचे काहीच बंधन नाही. कोणतीही आरोग्यदायी व्यक्ती त्यांच्या सोयीनुसार रक्तदान करू शकते.

गैरसमज : रक्तदानामुळे एचआयव्हीचा धोका वाढतो.

खरं काय ? :  रक्तदानादरम्यान स्टरलाईझ केलेल्या सुया वापरल्यास रक्तातून पसरणार्‍या इंफेक्शनचा धोका नक्कीच कमी होतो. आजकाल एकच सूई परत वापरली जात नाही. त्यामुळे निश्चितच हा धोका कमी आहे.