Breast Cancer Awareness Month: सेल्फ ब्रेस्ट एक्झामने घरच्या घरी सुरूवातीच्या टप्प्यावर ओळखा ब्रेस्ट कॅन्सरचा धोका
सेल्फ ब्रेस्ट एक्झाम (Photo Credits: Facebook/ Breast Cancer Awareness)

ऑक्टोबर महिना हा जागतिक स्तरावर महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाबाबत समाजात जागृकता निर्माण करण्यासाठी पाळला जातो. दिवसेंदिवस धावपळीच्या बनत चाललेल्या आपल्या जीवनमध्ये नकळत आपण आरोग्याला गृहित धरायला लागलो आहोत. प्रामुख्याने महिला त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. परिणामी कॅन्सरसारख्या आजाराचं निदान तो गंभीर टप्प्यावर पोहचल्यानंतरच स्त्रियांच्या लक्षात येते.

ब्रेस्ट कॅन्सर हा महिलांमध्ये प्रामुख्याने आढळून येणारा एक कॅन्सरचा प्रकार आहे. सामान्यपणे ब्रेस्ट कॅन्सरच्या निदानासाठी मॅमोग्राफी केली जाते. मात्र ही वेदनादायी प्रक्रिया आणि कॅन्सर सुरूवातीच्या टप्प्यांवरच ओळखायचा असेल तर सेल्फ ब्रेस्ट एक्झाम अत्यंत फायदेशीर आहे. घरच्या घरी प्रत्येक महिन्याला स्त्रियांनी सेल्फ ब्रेस्ट एक्झाम करणं आवश्यक आहे.  नक्की वाचा :  ब्रेस्ट कॅन्सरबाबत जागृती करण्यासाठी सेरेना विल्यम्सचं बोल्ड पाऊल, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

कोणती लक्षणं देतात ब्रेस्ट कॅन्सरचे संकेत ?

स्तनांचा आकार बदलणं

स्तनांमध्ये विशिष्ट प्रकारच्या वेदना जाणवणं

स्तनांमधून विशिष्ट स्वरूपाचा स्त्राव होणं ( स्तनपानाचे दूध वगळता)

स्तनाजवळचा भाग सुजणं, त्वचा जाडसर होणं

काखेत किंवा स्तनाजवळच्या भागात गाठी आढळणं

स्तनाजवळची त्वचा लालसर होणं, त्वचा सुकून पापुद्र्या निघणं

स्त्रियांना लहान सहान वाटत असली तरीही ही लक्षणं सुरूवातीच्या टप्प्यात कॅन्सरचे संकेत देत असतात. त्यामुळे वेळीच निदान झाल्यास भविष्यातील मोठा धोका रोखण्यास मदत होऊ शकते. यासाठी सेल्फ ब्रेस्ट एक्झाम अत्यंत आवश्यक आहे.

घरच्या घरी कशी कराल ब्रेस्ट एक्झाम टेस्ट ?

एखाद्या खोलीत किंवा बाथरूममध्ये तुम्ही सहज ही टेस्ट करू शकता. हात सरळ रेषेत वर करा. हळूहळू स्तनाच्या बाहेरील बाजूकडून आतील दिशेने गोलाकार दिशेने हात फिरवा. सुरूवात काखेपासून करावी. एखादी गाठ, जाडसरपणा जाणवतोय हे कटाक्षाने पहाणं गरजेचे आहे.

नियमित आरशासमोर उभं राहून तुमच्या स्तनाच्या रंगामध्ये, स्वरूपामध्ये काही बदल झाला आहे का? हे तपासून पहाणं गरजेचे आहे.

उभ्याने सेल्फ ब्रेस्ट टेस्ट झाल्यानंतर पाठीवर झोपा. खांद्याखाली उशी ठेवून हात वरच्या दिशेला करा. दुसरा हात स्तनाच्या बाजूने फिरवून गाठ, त्वचेचे स्वरूप तपासून पहा. स्तनातून स्त्राव होतोय का? याकडेही कटाक्षाने लक्ष देणं गरजेचे आहे.

स्तनाजवळ तुम्हांला एखादी गाठ जाणवल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या. वयापरत्वे शरीरात बदल होत असतात. तुम्हांला स्तनाजवळ गाठ आढळली तरी प्रत्येक गाठ ही कॅन्सरची असेलच असेदेखील नाही. त्यामुळे स्वतः घाबरून न जाता डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढील औषधोपचार ठरवणं आवश्यक आहे.

 महत्त्वाचा सल्ला  

सेल्फ ब्रेस्ट एक्झाम ही वयाची विशी पार केलेल्या प्रत्येक मुलीने महिन्यातून एकदा सेल्फ ब्रेस्ट टेस्ट करणे गरजेचे आहे. याचाचणी दरम्यान हलका दाब द्यावा, स्तनाजवळचा बहग नाजूक असतो. फार जोरात दाब दिल्यास अस्वस्थता वाढू शकते. तसेच मासिकपाळीच्या दिवसांत ही चाचणी टाळावी. या दिवसांत स्तन अधिक संवेदनशील होतात.