World Water Day 2021: आज जगात पाण्याचे संकट चालू आहे. असा एकही प्रदेश नाही जेथे पाण्याची आवश्यकता नाही. आजही लोकांना शुद्ध पाणी मिळत नाही. पुढील महायुद्ध पाण्यासाठी होईल, असं तुम्ही कित्येकदा ऐकलं असेल. मानव पाण्याचे महत्त्व विसरत आहे, ज्यामुळे आज पाण्याचे संकट सर्वांसमोर आहे. पाण्याचे महत्त्व समजावून सांगण्याच्या उद्देशाने जागतिक जल दिन (World Water Day) साजरा करण्यास सुरूवात झाली.
दरवर्षी संयुक्त राष्टाचे सदस्य असलेल्या देशांकडून हा दिवस साजरा केला जातो. त्यासाठी दरवर्षी एक नवी संकल्पना मांडली जाते. त्या संकल्पनेला अनुसरून वर्षभर उपक्रम राबवले जातात. यंदा 'वेल्यूइंग वाटर,' अशी जागतिक जल दिनाची थीम आहे. (वाचा -World Water Day: धोका ओळखा, पाणी वाचवा; अन्यथा पृथ्वीवर जीवसृष्टीचा विनाश अटळ)
जागतिक जल दिनाचा इतिहास -
जागतिक जल दिन साजरा करण्याचा आंतरराष्ट्रीय पुढाकार ब्राझीलमध्ये 22 मार्च 1992 रोजी रिओ दि जानेरो येथे झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण आणि विकासाच्या परिषदेत घेण्यात आला. 1993 मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने महासभेत हा दिवस वार्षिक कार्यक्रम म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला.
पाण्यासंदर्भातील काही महत्वाचे तथ्य -
- मुंबईत दररोज गाड्या धुण्यासाठी 50 लाख लिटर पाणी खर्च होते.
- दिल्ली, मुंबई आणि चेन्नईमध्ये पाईप लाईन खराब झाल्यामुळे 17 ते 40 टक्के पाणी वाया जाते.
- अनेक ठिकाणी महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी अंदाजे 6.4 किमी प्रवास करावा लागतो.
- पृथ्वीवर 70 टक्क्यांहून अधिक पाणी आहे. पण गोड्या पाण्याचे प्रमाण फारच कमी आहे. 97.3 टक्के पाणी हे क्षारयुक्त आहे, जे पिण्यास योग्य नाही.
- ब्रश करताना नळा खुला ठेवला तर पाच मिनिटांत सुमारे 20 ते 25 लिटर पाणी वाया जाते.
जगातील 10 पैकी 2 लोकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळत नाही.
- एखाद्या व्यक्तीस दररोज पिण्यासाठी 3 लिटर पाण्याची आणि जनावरांना 50 लिटर पाण्याची आवश्यकता असते.
- पृथ्वीवर येणाऱ्या सर्व वनस्पतींचे मानवांना पाणी मिळते.
एक किलो गहू उगवण्यासाठी एक हजार लिटर आणि एक किलो तांदूळ उगवण्यासाठी चार हजार लिटर पाण्याची गरज असते. अशाप्रकारे आपल्या जीवनात पाण्याचे अत्यंत महत्त्व आहे. पाण्यासंदर्भात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्याची कल्पना कदाचित आपल्याला नसेल. मात्र, वेळीच पाण्याचं महत्त्व जाणल्यास भविष्यात पाण्याची समस्या उद्भवणार नाही.