World-Health-Day-2020 (PC - File Photo)

World Health Day 2020: जगभरात 7 एप्रिल हा दिवस 'जागतिक आरोग्य दिन' म्हणून साजरा केला जातो. जागतिक स्तरावर आरोग्य समस्या आणि त्यावर विचार करण्यासाठी 7 एप्रिल 1948 रोजी जागतिक आरोग्य संमेलन झाले. त्यात मानवासमोर असणारी आरोग्य समस्या सर्वांनी एकत्र येऊन सोडवावी यावर एकमत झाले. विभिन्न वंशांच्या समस्या वेगळ्या असं वाटत असलं तरी सारे मानव एक या न्यायाने आरोग्य समस्या आणि त्यावर उपाय हे साधारणपणे समान आहेत. त्यानंतर 7 एप्रिल 1950 पासून जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शनात आरोग्य दिन साजरा करण्यास सुरूवात झाली.

बदलत्या काळानुसार, आरोग्य समस्या आणि त्यांच्या फैलाव होताना दिसत आहे. प्रचंड प्रतिकारशक्ती असणारे विषाणू (व्हायरस) आरोग्याची समस्या अधिक गंभीर बनवत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर यासाठी विशिष्ट प्रकारचे धोरण असणे अत्यंत आवश्यक आहे. असुरक्षित लैंगिक संबंध आणि रक्तसंक्रमणातून पसरणारा एचआयव्हीचा विषाणू बाधित व्यक्तीची रोगप्रतिकार शक्ती मोडून काढत असतो. परिणाम स्वरुप एडस् चे आव्हान गेल्या दोन दशकांपासून जगातील अनेक देशांपुढे आहे. (हेही वाचा - Gudi Padwa 2020: गुढी पाडव्याला 'कडुलिंब' का खातात? जाणून घ्या कडूलिंबाचे औषधी गुणधर्म)

सध्या जगातील संपूर्ण देश कोरोना व्हायरसच्या विळख्यात अडकले आहेत. या विषाणुमुळे आतापर्यंत जगभरात हजारोंच्या संख्येने बळी गेले आहेत. सध्या कोरोना व्हायरसवर कोणतीही लस उपलब्ध नाही. कोरोना व्हायरस हा संसर्गजन्य आजार आहे. त्यामुळे या आजाराला आळा घालणं जगातील सर्व देशांपुढे एक मोठं आव्हान आहे. यापूर्वी 'बर्ड फ्लू' तसेच 'स्वाईन फ्लू' आदी संसर्गजन्य आजारांनी जगभरात थैमान घातले होते. या व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशांतर्गत प्रवासी वाहतुकीवर बंधने घालण्याची वेळ अनेक देशांवर आली. प्राण्यांची वाहतूक बर्ड फ्लूमुळे बंद करावी लागली. याशिवाय मध्यंतरी आफ्रिकेत झालेला 'ईबोला' किंवा भारतातील 'चिकन गुणिया' आणि 'डेंग्यू'चा प्रसार अनेकांचे प्राण घेणारा ठरला. या सर्व आजारांच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेचे अस्तित्व आणि कार्य अतिशय महत्त्वपूर्ण आहे.

जेव्हा अशा प्रकारचे आजार संपूर्ण जगभरात पसरतात तेव्हा जागतिक आरोग्य संघटना महत्त्वाचे काम करते. यंदा 'Support Nurses and Midwives' अशी थीम आहे. सध्या जगातील सर्व देशांपुढे कोरोनाचे मोठे संकट उभे आहे. कोरोनाग्रस्तांच्या सेवेसाठी डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी जीवाची बाजी लावत आहेत. रुग्णालयातील परिचारिका, दायी आपला जीव धोक्यात घालून कोरोना बाधित रुग्णांची सेवा करत आहेत. यंदा 'परिचारिका आणि दायींना आधार' अशी जागतिक आरोग्य दिनाची थीम ठेवण्यात आली असून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली आहे.