Ganeshotsav 2019: गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi) म्हणजे आपल्या लाडक्या बाप्पाचा जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. हिंदू धर्मात श्रीगणेशाला सर्वप्रथम पूजेचा मान आहे. इतकच नव्हे गणपती विद्येची देवता असल्यामुळे एखादं मुलं सर्वात पहिल्यांदा अभ्यासाला किंवा लिहायला सुरुवात करतो तेव्हा त्याला अभ्यासाचा श्रीगणेशा कर असं सांगून पाटीवर पहिले अक्षर ||श्री|| असे लिहिले जाते. गणपतीला अनेक नावे आहेत किंबहुना त्याची अनेक रुपे आहेत. आपल्या लाडक्या गणरायाला विघ्नहर्ता असेही म्हणतात.
आपल्या या लाडक्या गणरायाला जगात आणण्यासाठी पार्वती ला फार मोठी तपश्चर्या करावी लागली. किंबहुना त्याचे फळ की काय संपुर्ण सृष्टीला हे लाडके गणराय मिळाले. काय होती गणेशाच्या जन्माची कथा, जाणून घ्या सविस्तर
एकदा पार्वती देवीला आंघोळीसाठी जायचे होते. पण आसपास लक्ष ठेवण्याकरता कोणीच नव्हते. तेव्हा पार्वती देवीने आपल्या अंगावरील मळाने एक मूर्ती बनवली आणि ती जिवंत केली. या मूर्तीला पहारेकरी नेमलं आणि सांगितलं की, कोणालाही आतमध्ये येऊ देऊ नकोस. असे सांगून पार्वतीमाता स्नानासाठी आत गेली. भगवान शंकर काही वेळाने तिथे आले आणि ते आत जाऊ लागले. तोच त्या पहारेकऱ्याने त्यांना अडवले. त्याला माहित नव्हते की आपल्यासमोरील व्यक्ती कोण आहे तो केवळ आपल्या पार्वती मातेने दिलेल्या आज्ञेचे पालन करत होता. त्यावर भगवान शंकर संतप्त झाले आणि त्यांनी त्या पहारेकऱ्याचं शिर धडावेगळं केलं. पार्वतीदेवी जेव्हा स्नान करून बाहेर आली तेव्हा त्यांनी हा प्रकार पाहिला आणि त्या संतापल्या. त्यावेळी त्यांना शांत करण्यासाठी तेव्हा शंकर देवांनी आपल्या गणाला आदेश दिले की, पृथ्वीतलावर जाऊन सर्वात आधी जो प्राणी दिसेल त्याचं शिर कापून घेऊन ये. गण बाहेर पडल्यावर सर्वात आधी त्याला हत्ती दिसला. तो त्याचं शिर घेऊन आला. भगवान शंकरांनी ते शिर पुतळ्याला लावले आणि त्या मूर्तीला जिवंत केले. हा पार्वतीचा मानस पुत्र गज (हत्ती) आनन (मुख) म्हणजेच गजानन होय. शंकर देवाने त्याला गणाचा ईश म्हणेज देव म्हणून गणेश नाव ठेवलं. हा दिवस चतुर्थीचा होता. त्यामुळे चतुर्थीला गणेश चतुर्थी म्हणून महत्त्व आहे.
हेही वाचा- मुंबई: गणेशोत्सव 2019 च्या मिरवणूकांदरम्यान कमजोर पुलांवर नाचणं टाळा; प्रशासनाचं गणेशभक्तांना आवाहन
गणेश चतुर्थीच्या दिवशी विविध रूपात गणेशाची पूजा केली जाते. या मूर्ती तयार करणे ही एक अद्वितीय अशी कला आहे ज्यातून निराकारापर्यंत पोहोचता येते. यंदा ही चतुर्थी 2 सप्टेंबरला सर्वत्र साजरी केली जाईल. त्यामुळे ज्या गणरायाचे तुम्ही अगदी थाटामाटात, जल्लोषात स्वागत कराल त्यांच्या जन्माची कहानी तुमच्या पर्यंत पोहोचवणे हाच आमच्या लेखाचा उल्लेख होता.