Veer Savarkar Death Anniversary 2019: स्वातंत्र्यवीर सावरकर पुण्यतिथी निमित्त जाणून घ्या त्यांच्याबद्दल '10' खास गोष्टी
Veer Savarkar 53 rd Death Anniversary (Photo Credits: savarkar.org)

Veer Savarkar 53rd Death Anniversary: विनायक दामोदर सावरकर (Vinayak Savarkar)  प्रतिभावान व्यक्तिमत्त्वाच्या  क्रांतिकारकाने  त्यांचे सारे आयुष्य भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून अर्पण केले. विचारवंत, लेखक,तत्त्वज्ञ, भाषाकार आणि स्वातंत्र्यसेनानी असे त्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. सावरकरांचे प्रखर विचार त्यांच्या लिखणातून, भाषणातून आणि कवितांमधून लोकांसमोर आले. अत्यंत खडतर प्रवास केल्यानंतर वयाच्या  83 व्या वर्षी 26 फेब्रुवारी 1966  रोजी त्यांचे निधन झाले. मूळचे नाशिकचे(Nashik) सावरकर पुढे ब्रिटिशांविरूद्ध लढले. अंदमान येथे काळकोठडीत राहिले. भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून त्यांनी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली. अत्यंत खडतर प्रवास केलेला हा स्वातंत्र्यसैनिक त्याच्या प्रखर विचारांसाठी कायम सार्‍यांच्या लक्षात राहिला पण त्यांच्याबद्दल अजूनही अनेक गोष्टी आजच्या पिढीपर्यंत आलेल्या नाहीत. स्वातंत्र्यवीर सावरकर 'दहशतवादी', BA अभ्यासक्रमातील पाठ्यपुस्तकात संतापजनक उल्लेख

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल काही खास गोष्टी

  • विनायाक दामोदर सावरकर हे प्रखर हिंदुत्त्ववादी होते. त्यांना 'स्वातंत्र्यवीर' ही उपाधी प्रसिद्ध मराठी लेखक व पत्रकार प्रल्हाद केशव अत्रे यांनी दिली.
  • जयोऽस्तुते श्री महन्मंगले आणि स्वदेशीचा फटका या रचना वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी लिहल्या आहेत.
  • लंडनमध्ये कायद्याचं शिक्षण घेत असताना जोसेफ मॅझिनी या इटालियन विचारवंताच्या आत्मचरित्राचे मराठी भाषांतर केले. या भाषांतराला सावरकरांची असलेली प्रस्तावना भारतीयांसाठी सशस्त्र क्रांतीचे तत्त्वज्ञान ठरले. अनेक तरूणांना ही प्रस्तावना अगदी तोंडपाठ होती.
  • स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाले म्हणून सावरकरांची पदवी काढून घेण्यात आली तसेच त्यांना बॅरिस्टर ही पदवी नाकारण्यात आली.
  • स्वातंत्र्यवीर सावरकर हे केवळ स्वातंत्र्यसेनानी नव्हते तर त्यांनी भाषाशुद्धीकरणासाठीदेखील मोठ्या प्रमाणात चळवळ सुरू केली होती. मराठी भाषेतील अनेक शब्द त्यांनी चलनात आणले. सोबतच त्यांनी विज्ञाननिष्ठेचा प्रचार केला.
  • एक वेळ देशात थोडी गोहत्या झाली तरी चालेल, पण उभ्या राष्ट्राची बुद्धिहत्या होता कामा नये. असे त्यांचे विचार होते. कोणत्याही पशूला देवाचा दर्जा देऊन त्यांची पूजा करणं हे सावरकरांना मान्य नव्हते.
  • सावरकरांनी अंदमानच्या तुरुंगात असताना काही उर्दू गझल लिहल्या होत्या. त्यांचे हे साहित्य आता बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांच्या आवाजात रेकॉर्ड करण्यात आल्या आहेत.
  • भारताची फाळणी आणि त्यानंतर कॉंग्रेसने घेतलेल्या भूमिकांवर सावरकरांनी प्रखरपणे टीका केली. हिंदू सभेचे नथुराम गोडसे यांनी महात्मा गांधींची हत्या केली. यानंतर गांधी हत्येप्रकरणामध्ये सावरकरांचेही नाव होते मात्र कोर्टाने त्यामधून त्यांची सुटका केली.
  • 26 फेब्रुवारी 1966 मध्ये वयाच्या 83 व्या वर्षी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा मृत्यू झाला. 1 फेब्रुवारी 1966 पासून त्यांनी अन्न, पाणी आणि औषधाचा त्याग केला. त्यानंतर हळूहळू प्रकृती खालावल्याने त्यांचे निधन झाले.
  • सावरकरांनी त्यांच्या मृत्यूनंतर कोणत्याच रीती, रूढी, परंपरा यानुसार सुतक, श्राद्ध न करण्याबाबत सांगितलं होते. त्यांच्यामते मृत्यूनंतर त्याच्या देहाला विद्युत वाहिनीत अंतिम निरोप दिला जावा.

हिंदू राष्ट्र व्हावे ही सावरकरांची इच्छा होती, त्यासाठी त्यांनी आयुष्यभर अथक प्रयत्न केले. अनेक कठोर शिक्षा सहन केल्या. सावरकरांचे निधन मुंबईतील दादर भागामध्ये झाले.