Vasant Panchami 2019 (Photo Credits: YouTube)

माघ शुक्ल पंचमी म्हणजे 'वसंत पंचमी.' (Vasant Panchami) सर्व ऋतुंचा राजा असणाऱ्या वसंत ऋतुच्या आगमनाची चाहुल या दिवशी लागते. तसंच या दिवशी देवी सरस्वतीचा जन्मदिवस असतो, असेही मानले जाते. भारतातील पंजाब (Punjab) राज्यात या दिवशी पतंग उत्सव (Kite Festival) अगदी उत्साहाने साजरा केला जातो. महाराजा रणजीत सिंग (Maharaja Ranjit Singh) यांच्यापासून सुरु झालेली ही परंपरा 200 वर्षांनंतरही अगदी आनंदाने साजरी केली जाते.

कशी साजरी करतात वसंत पंचमी?

सरस्वती पूजन

वसंत पंचमीला देवी सरस्वतीची उत्पत्ती झाली, असे मानले जाते. त्यामुळे या दिवशी सरस्वती देवीची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. पहाटे लवकर उठून अभ्यंगस्नान करुन सरस्वती देवीची पूजा आणि प्रार्थना केली जाते. तसंच काही ठिकाणी कलशाची स्थापना करुन पूजा करण्याची पद्धत आहे. या दिवशी सरस्वती  देवीची पूजा करुन नवीन पिकांच्या लोंब्या देवीला अर्पण करतात. घरात, कुटुंबात अशीच भरभराट होऊ दे, अशी मनोभावने देवीचरणी प्रार्थना केली जाते.

सरस्वती देवी ही विद्येची आणि ज्ञानाची देवता असून तिच्या हातात पुस्तक, वीणा असते. तर एका हाताची मुद्रा केलेली असते. याचाच अर्थ चांगली बुद्धीमत्ता, उत्तम शिक्षण तसंच शिक्षणेतर कलेत प्रावीण्य मिळवण्यासाठी सरस्वती देवीची प्रार्थना केली जाते. देवीच्या हाताची मुद्रा एकाग्रता दर्शवते. याचाच अर्थ तुम्हाला कोणत्याही कामात एकाग्र व्हायचे असेल तर देवीची उपासना करणे नक्कीच फायदेशीर ठरेल. (माघी गणेशोत्सव आणि भाद्रपद गणेश चतुर्थी हे वेगवेगळे साजरं करण्यामागील कारण काय?)

वसंत पंचमी ही अजून एका कारणासाठी विशेष मानली जाते. यादिवशी कामदेव मदनाचा जन्म झाला, असे म्हटले जाते. म्हणून सुखी दांपत्यजीवनासाठी अनेक ठिकाणी रतिमदनाची पूजा, प्रार्थना करण्याची पद्धत आहे.

आपल्याकडील प्रत्येक सण, उत्सवाला एक विशेष अर्थ आहे. तसंच वसंत पंचमीही अर्थपूर्ण आहे. सृष्टीतील नवचैतन्य, नवनिर्मितीमुळे मिळणारा आनंद साजरा करण्यासाठी हा उत्सव साजरा केला जातो.