Varalaxmi Vrat 2020 (Photo Credits: Facebook)

आज 31 जुलै शुक्रवार. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्ष द्वादशी तिथी. या दिवशी वरलक्ष्मीचे व्रत केले जाते. माता वरलक्ष्मी महालक्ष्मीचे रुप आहे. वरदान देणारी आणि भाविकांच्या सर्व मनोकामना पूर्ण करणारी देवी म्हणून वरलक्ष्मी देवीची पूजा केली जाते. त्यामुळे वर देणारी आणि लक्ष्मीचे रुप म्हणून या देवीचे नाव वरलक्ष्मी असे पडले. दिवाळीत करणाऱ्या येणाऱ्या लक्ष्मीपूजना इतकेच या व्रताचे महत्त्व आहे. दारिद्रय नष्ट करणाऱ्या आणि कार्यातील विघ्न दूर करणाऱ्या वरलक्ष्मी आणि श्री गणेशाची पूजा या व्रतानिमित्त केली जाते. आज देशात अनेक ठिकाणी वरलक्ष्मीचे व्रत केले जाईल. आज वरलक्ष्मी व्रतानिमित्त जाणून घेऊया लक्ष्मी देवी बद्दल काही विशेष गोष्टी:

लक्ष्मी मातेच्या जन्माची कथा:

लक्ष्मी संपन्नतेची देवी आहे. भगवान विष्णू पृथ्वीवर अवतार घेतात तेव्हा लक्ष्मी देवी त्यांची मदत करण्यासाठी विविध अवतार घेऊन पृथ्वीवर दाखल होते असे मानले जाते. भृगु ऋषी आणि त्यांची पत्नी ख्याती यांना एक सुंदर कन्येचा लाभ झाला. सर्व चांगल्या गुणांनी ती युक्त होती. त्यामुळे त्या कन्येचे नाव लक्ष्मी ठेवण्यात आले. मोठी होत असताना लक्ष्मीने भगवान विष्णु यांच्या गुणांबद्दल ऐकले आणि त्याने ती प्रभावित झाली. प्रभावित झालेल्या लक्ष्मी विष्णुची भक्ती करु लागली. विष्णुला पतीच्या रुपात प्राप्त करण्यासाठी समुद्रात खोल लक्ष्मीने कठोर तप केले. अनेक वर्षांनंतर एकदा इंद्र देवाने तिची परीक्षा घेण्याचे ठरवले आणि वरदान मागण्यास सांगितले. त्यावेळेस तिने विश्वरुप दर्शन करण्याची मागणी केली. तेव्हा इंद्रदेव शरमेने तेथून परतले आणि त्याठिकाणी साक्षात विष्णू प्रकट झाले. त्यांनी लक्ष्मीची विश्वरुप दर्शनाची इच्छा पूर्ण केली आणि तिचा पत्नी म्हणून स्वीकार केला.

दुसरी कथा अशी सांगितली जाते की, एकदा महर्षी दुर्वासा एका वनात गेले. तेथे त्यांना कोणीतरी एक दिव्य माळ भेट म्हणून दिली. तेथून पुढे निघाले असताना त्यांना मध्ये ऐरावतावर विराजमान झालेले इंद्रदेव भेटले. महर्षी दुर्वासा यांनी ती दिव्य माळ इंद्रदेवाला दिली. इंद्रदेवाने ती माळ ऐरावताच्या डोक्यावर घातली. ऐरावताने ती माळ पायाखाली चिरडली. ते पाहुन महर्षी दुर्वासा क्रोधित झाले आणि इंद्राला धनहीन होण्याचा शाप दिला. त्या शापामुळे इंद्राच्या हातात असलेले देवलोक निसडून गेले आणि असूरांचे राज्य आले. त्यामुळे देव अत्यंत त्रासले. त्यानंतर सर्वजण भगवान विष्णू जवळ गेले. त्यातून बाहेर पडण्यासाठी विष्णूने सागर मंथनाचा प्रस्ताव सर्वांसमोर ठेवला. देव आणि दानवात झालेल्या समुद्र मंथनातून अनेक चमकत्कारीक वस्तू बाहेर पडल्या. त्याचदरम्यान सफेद कमळावर विराजमान झालेली लक्ष्मी देवी समुद्र मंथनातून बाहेर आली. लक्ष्मी देवीचे दर्शन होताच सर्व देव प्रसन्न झाले आणि त्यांनी तिला वंदन केले.

वरलक्ष्मी व्रत प्रामुख्याने तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा या दक्षिणेकडील राज्यात केले जाते. विवाहित महिला कुटुंबाच्या कल्याणासाठी हे व्रत करतात. या दिवशी उपवास केला जातो. तसंच लक्ष्मीच्या आठ रुपांचे देखील पूजन केले जाते.