कार्तिकी एकादशी साजरी होणारी एकादशी ही 'उत्पत्ती एकादशी' (Utpatti Ekadashi) आहे. कार्तिक कृष्ण एकादशीला 'उत्पत्ती एकादशी' म्हणतात. यंदा ही एकादशी 9 डिसेंबर दिवशी साजरी केली जाणार आहे. हिंदू मान्यतांनुसार, देवी एकादशीच्या उत्पत्तीचा हा दिवस असल्याने उत्पत्ती एकादशी म्हणून ती साजरी केली जाते. पुराणातील कथेनुसार, 'एकादशी' ही एक देवी असून तिचा जन्म भगवान विष्णूमुळे झाला होता. ही एकादशी कार्तिक कृष्ण एकादशी या दिवशी प्रकट झाल्याने तिचे नाव 'उत्पत्ति एकादशी' असे पडले. या दिवशी एकादशीचं व्रत आणि उपवास करण्याची प्रथा आहे. तसेच मांसाहार वर्ज्य केला जातो. या दिवशी भगवान विष्णूंची देखील पूजा केली जाते.
उत्पत्ति एकादशी 2023 तारीख
एकादशींत स्मार्त व भागवत असे दोन भेद आहेत. या स्मार्त व भागवत अशा प्रकारच्या एकादशा नेहमीं येत नाहींत. त्यांच्यांतील वर पाहता असा भेद म्हणजे असा की, ज्या वेळीं दोन एकादशा येतील त्या वेळीं स्मार्त पूर्व दिवशीं व भागवत एकादशी दुसर्या दिवशीं येते. भागवत एकादशी नेहमीं द्वादशी ला असते. त्यानुसार, 8 डिसेंबरला स्मार्त आणि 9 डिसेंबरला भागवत एकादशी असेल.
उत्पत्ति एकादशीची कथा
कथेनुसार, सतयुगात चंद्रावती नगरीत ब्रह्मवंशज नाडी जंग राज्य करीत होता. त्याला मूर नावाचा एक मुलगा होता. मूर हा एक अतिशय बलवान दानव होता. त्याने आपल्या पराक्रमाने सर्व देवतांना त्रास देण्यास सुरूवात केली होती. इंद्र व इतर देवतांचा पराभव करून त्याने आपले साम्राज्य निर्माण केले होते. कोणत्याही देवतांचा त्याच्या पराक्रमासमोर निभाव लागत नव्हता. त्यानंतर देवतांनी भगवान विष्णुंकडे जाऊन मूर दानवाच्या अत्याचारापासून मुक्ती मिळावी म्हणून प्रार्थना केली. त्यानंतर भगवान विष्णुंनी मूरवर आक्रमण केले. हे युद्ध हजारो वर्ष चालले. या दरम्यान शेकडो दैत्य मारले गेले आणि विष्णू यांना झोप येऊ लागली. ते सिंहावती गुहेत जाऊन झोपायलाअ गेले . त्यांना मारण्याच्या उद्देशाने मूर पुन्हा त्या गुहेत गेला. त्यानंतर विष्णूंना झोपलेले पाहून वार करण्यासाठी जसे मूरने शस्त्र उचलले तसे भगवान विष्णुंच्या शरीरातून एक सुंदर कन्या प्रकट झाली. त्यानंतर दैत्य व कन्या यांच्यात बराच काळ युद्ध झाले. त्या कन्येने दैत्यास धक्का मारून मूर्च्छित केले व त्याचा शिरच्छेद केला. त्यामुळे दैत्य मृत्यू पावला. जेव्हा विष्णू झोपेतून उठले तेव्हा त्यांनी पाहिले की, दैत्य मरण पावला आहे.
त्यानंतर भगवान विष्णुंना यावर प्रश्न पडला. यावर या कन्येने दैत्याच्या वधाचा खुलासा केला. तेव्हा भगवान विष्णुंनी तिचे नाव 'एकादशी', असे ठेवले. कारण, एकादशीलाच्या दिवशी ही कन्या विष्णुंच्या शरीरातून प्रकट झाली होती. त्यामुळेच या दिवसाला 'उत्पत्ति एकादशी', असे म्हटले जाते. त्यामुळे विष्णुंनी एकादशीला असा वर दिला की, प्रत्येक महिन्याच्या एकादशीला जो कोणी उपास करेल त्याच्या सर्व पापांचा नाश होऊन त्याला विष्णुलोकात स्थान मिळेल.