Diwali 2019: धनतेरसला सोनं खरेदी करताय? तर ‘या’ गोष्टींची घ्या काळजी
Gold Jewellery (Photo Credit - Wikimedia )

Diwali 2019: धनतेरस किंवा धनत्रयोदशीच्या (Dhanteras) दिवसापासून राज्यासह देशभरात विविध स्वरूपामध्ये दिवाळी साजरी करायला सुरूवात होते. या दिवशी लोक सोन्या-चांदीचे दागिने विकत घेतात. लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा या दिवशी प्रत्येकजण आपल्या परिस्थितीप्रमाणे एखादा तरी दागिना किंवा कोणतीही सोनं-चांदीच्या वस्तूची खरेदी करतात. परंतु, सोन्याच्या वस्तू खरेदी करताना ग्राहकांनी विशेष काळजी करणं गरजेचं आहे. चला तर मग या खास लेखातून सोनं खरेदी करताना कोणती काळजी घ्यायची हे जाणून घेऊयात.

सोन्याच्या दराची माहिती करून घ्या

या दिवाळीत तुम्ही सोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर 15 दिवस आधीपासून सोन्याच्या दरांवर नजर ठेवा. त्यामुळे तुम्हाला सोन्याच्या भावातील चढ-उताराची कल्पना येईल. सोन्याचे भाव पाहण्यासाठी तुम्ही बिझनेस वेबसाईटची माहिती मिळवा. सोन्याचे भाव कमी झाल्यावर तुम्ही सोनं खरेदी करू शकता.

Diwali 2018 : धनतेरस दिवशी मुंबई,पुणे ठिकाणी सोनं, चांदीचा नेमका दर काय ?

सोन्याची शुद्धता तपासा -

सोन्याच्या दागिन्यांसाठी साधारणत: 22 कॅरेट किंवा 24 कॅरेटचा वापर केला जातो. 22 कॅरेट म्हणजे, यात 75 % सोनं आणि उर्वरित 25 % अन्य धातू असतात. शुद्ध सोन्याचे अर्थात 24 कॅरेटच्या सोन्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे सोन्यात इतर धातू वापरले जातात. त्यामुळे सोनं खरेदी करण्यापूर्वी दागिन्यांमध्ये किती अन्य धातू मिसळले आहेत, हे पाहणं गरजेचं आहे. सोन्याची शुद्धता पाहण्यासाठी सराफाकडे विशिष्ट मशीन असते. या मशीनच्या साहाय्याने तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता आणि शुद्ध सोन्याची खरेदी करू शकता.

दागिन्यांवरील हॉलमार्क तपासा -

भारत सरकारने ‘ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड’ला सोन्याच्या दागिन्यांवर ‘हॉलमार्क’ लावण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार, प्रत्येक दागिन्यावर हॉलमार्क असणं गरजेचं आहे. ग्राहकांनी सोनं खरेदी करण्याअगोदर त्यावर हॉलमार्क आहे की नाही, हे तपासावे आणि त्यानंतरच दागिन्यांची खरेदी करावी.

Diwali 2018 धनतेरस विशेष : नरेंद्र मोदी आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेतील सोन्या, चांदीच्या वीटा विक्रीला !

 दागिन्यांवरील मजुरी

सोन्याचे दागिने खरेदी केल्यानंतर त्यावर मेकिंग चार्जेस म्हणजेच मजुरी दर आकारला जातो. सराफ आपल्या मनाप्रमाणे दागिन्यांवर मेकिंग चार्जेस लावतात. अनेकदा ग्राहकांनी सराफाला विनंती केल्यानंतर सराफ त्यावरील चार्जेस कमी-अधिक करू शकतो.

 दागिने खरेदी केल्यानंतर बिल घ्या -

कोणत्याही दुकानातून सोने खरेदी करताना पक्के बिल घ्या. त्यात किती कॅरेटचे सोने आहे, बाजारभाव कोणता घेतला आहे, मजुरी किती लावली आहे याची खात्री करा.

धनतेरसच्या दिवशी यंदा सोन्याचा सर्वाधिक दर कोलकत्त्यामध्ये आहे. तसेच सर्वात स्वस्त सोनं आज केरळमध्ये उपलब्ध आहे. मुंबईतील सोनं बाजारभावानुसार 24 कॅरेट सोनं 32,726, 22 कॅरेट सोनं 31,166 रूपायांमध्ये विकत घेता येणार आहे. पुण्यातील सराफ बाजरात 24 कॅरेट सोन्याचा दर 32,708 आणि 22 कॅरेट सोन्याचा दर 31,168 रूपये इतका आहे.