Richest Ganpati In Mumbai: 2 सप्टेंबर, 2019 रोजी, भाद्रपद शुद्ध चतुर्थीस गणरायाचे आगमन झाले आहे. 11 दिवसांनतर म्हणजे गुरुवारी गणपतींचे विसर्जन होईल. महाराष्ट्रात हा सण मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. लोकमान्य टिळकांनी या उत्सवाची सुरुवात करून घरातील गणपती सार्वजनिक केला. त्यानंतर प्रत्येक गावात गणपती मंडळांची धूम दिसू लागली. पुणे-मुंबई सारख्या मोठ्या शहरांत तर हा थाट विचारू नका. मुंबईमध्ये लालबागचा राजा आणि सिद्धिविनायक यांसह इतर काही सार्वजनिक मंडळे आहेत त्यांचेही गणपती प्रचंड लोकप्रिय आहेत. हे गणपती मुंबईमधील सर्वात श्रीमंत गणपती म्हणूनही ओळखले जातात. गणपतीचा विमा, सोन्या चांदीचे दागिने, डिझाईनर कपडे असा या बाप्पांचा थाट असतो. चला पाहूया मुंबईमधील अशाच काही गणपतींबद्दल.
जीएसबी गणपती (GSB Ganpati) - गौड सारस्वत ब्राह्मण (जीएसबी) मंडळाचा हा गणपती. मुंबईतील श्रीमंत आणि सोन्याने मढलेला गणपती म्हणून जीएसबी गणपतीची ख्याती आहे. या मंडळाची स्थापना 1951 साली झाली होती. यावर्षी या गणपतीला तब्बल 202 कोटींचे दागिने परिधान करण्यात आले आहेत. या मंडळाभोवली 100 सीसीटीव्ही करडी नजर ठेऊन आहेत. तसेच 4500 सुरक्षा रक्षक आणि मंडळाचे कार्यकर्ते डोळ्यात तेल घालून या गणपतीचे रक्षण करत आहेत. तरीदेखील या गणपतीचा 265 कोटींचा विमा काढण्यात आला आहे.
लालबागचा राजा (Lalbaugcha Raja)- लालबागचा राजा हा फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात प्रसिद्ध असा गणपती आहे. गणेशोत्सवाच्या काळात या गणपतीच्या दर्शनासाठी लोक कित्येक तास रांगेत उभे असतात. विविध क्षेत्रातील लोकांचे हे श्रद्धास्थान आहे. मागच्या वर्षी दान रूपाने या गणपतीला 1 कोटी 58 लाख रुपये मिळाले होते. यावर्षीदेखील इतकेच दान मिळण्याची अपेक्षा आहे. या गणपतीचा 25 कोटी रुपयांचा विमा आहे.
अंधेरीचा राजा (Andheri cha Raja) - 1966 सालपासून अंधेरीचा राजा विराजमान झाला आहे. आझाद नगर उत्सव समिती हा गणेशोत्सव उत्सावाने साजरा करते. पश्चिम उपनगरातील हे लोकप्रिय गणेशमंडळ आहे. यावर्षी गणपतीला 2 कोटींचे दागिने परिधान करण्यात आले आहेत. या गणपतीचा 5.25 कोटीचा विमा उतरवण्यात आला आहे. हा गणपती नवसाला पावतो अशी त्याची ख्याती आहे. या गणपतीची मूर्ती बनवण्यासाठी अनेक लोक दान करतात. याच दानाची नोंदणी 2028 पर्यंत झाली आहे. (हेही वाचा: Ganeshotsav 2019: पुण्यातील मानाचे पाच गणपती; जाणून घ्या प्रत्येक गणपतीचा इतिहास आणि महत्व)
दरम्यान, महाराष्ट्रात अष्टविनायक, विदर्भात आठ गणपती, मुंबईचा सिद्धिविनायक तसेच पुण्यात 5 मानाचे गणपती प्रसिद्ध आहेत. पुण्यातील इतर सार्वजनिक मंडळांचे गणपती एका बाजूला आणि हे पाच मानाचे गणपती एका बाजूला, असा यांचा थाट असतो. कसबा गणपती (पुण्याचे ग्रामदैवत), तांबडी जोगेश्वरी गणपती, गुरुजी तालीम गणपती, तुळशीबाग गणपती आणि केसरीवाडा गणपती हे ते गणपती होय.