Tanaji Malusare Death Anniversary: नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्याविषयी काही खास गोष्टी!
Tanaji Malusare (Photo Credit: Twitter)

तानाजी मालुसरे हे मराठांच्या इतिहासातील एक अजरामर नाव. गड आला पण सिंह गेला हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वक्तव्याला साजेसं कर्तृत्व असणारा एक मोठा लढवय्या म्हणजे तानाजी मालुसरे. शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घेताना तानाजी मालुसरे यांच्या शौर्यगाथेची ओळख होते. शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या प्रतिज्ञेत त्यांना त्यांच्या सहकाऱ्यांची अमूल्य साथ मिळाली. त्यांच्या सहकाऱ्यांनी देखील शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्य मिळवण्यासाठी लढण्याची शपथ घेतली. शिवाजी महाराजांच्या या मौल्यवान सहकाऱ्यांपैकी एक म्हणजे तानाजी मालुसरे. उद्या 4 फेब्रुवारी रोजी सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांची पुण्यतिथी. त्या निमित्ताने जाणून घेऊया तानाजींविषयी काही खास गोष्टी:

# तानाजी मालुसरे हे शिवाजी महाराजांचे बालपण मित्र आणि विश्वासू साथीदार. प्रत्येक संकटात त्यांनी महाराजांना मोलाची साथ दिली.

# किल्ले हाती घेण्याच्या मोहिमेत सुरुवातीपासूनच तानाजी आघाडीवर होते. ऐतिहासिक अफजल खान वधाच्या वेळी देखील त्यांनी असीम शौर्य दाखवले होते.

# शाहिस्तेखानचा फडशा फाडण्यासाठी महाराज 10-12 विश्वासू साथीदारांसह लाल महालात घुसले तेव्हा त्यातही तानाजी मालुसरे यांचा समावेश होता. त्यामुळे त्यांचा प्रत्येक पराक्रम पाहणाऱ्या महाराजांनी कोंढणा सर करण्याची जबाबदारीही तानाजींकडे सोपवली.

# तानाजी हे बारा हजार पायदळाचे सुभेदार होते. त्यांना पालखीचा व पाच कर्ण्यांचा मान होता.

# मोघलांसोबत केलेल्या पुरंदर तहानुसार शिवाजी राजांना कोंढाणा किल्ल्यासह इतर 22 किल्ले मोघलांच्या हाती सोपवावे लागले. यामुळे मराठ्यांच्या स्वाभिमानाला धक्का लागला होता. तर राजमात जिजाऊ देखील दु:खावल्या गेल्या होत्या.

# जिजाऊंच्या मनातील सल राजांना कळत असली तरी कोंढाणा परत मिळवणे तितकेसे सोप्पं नव्हतं. कोंढाण्याभोवती मुघलांचे प्रचंड संरक्षण कवच होते. तिथील किल्लेदार उदयभान राठोड शुर होता. पण मातेच्या हट्टापुढे राजे नमले आणि त्यांनी कोंढाणा परत मिळवण्याचा पण केला.

# मुलाच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त असतानाही देखील त्यांनी शिवाजीराजांच्या शब्दाखातर त्यांनी कोंढणा सर करण्याचे आव्हान स्वीकारले. आधी लगीन कोंढाण्याचे मग रायबाचे हे त्यांचे शब्द त्यांच्या निष्ठेची साक्ष देतात.

# कोंढाणा किल्ल्यासाठी सरदार उदयभान चे सैन्य आणि तानाजी मालुसरे यांच्यात झालेल्या युद्ध सर्वश्रूत आहे.

या युद्धात कोंढाणा सर करत तानाजी धारातीर्थी पडले. त्यामुळे 'गड आला पण सिंह गेला' म्हणत छत्रपती शिवाजी महाराज हळहळले.