Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

Ramzan Eid 2019: वर्षभरापासून समस्त मुस्लिम बांधव ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहतात तो 'रमजान ईद' (Ramzan Eid) हा सण अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलाय. येत्या 5 जून येणा-या रमजान ईद या सणाासाठी मुस्लिम बांधवांमध्ये खूप उत्साह पाहायला मिळतो. सर्वत्र बाजार सजलेत. मुंबईतील मोहम्मद अली रोडवर तर या दिवसात विशेष रेलचेल पाहायला मिळते. रमजान ईद साजरी करण्याची मुस्लिम बांधवांची थाटच काही वेगळा असतो. महिनाभर अगदी कडक उपवास(रोजा) करुन ईदचा चंद्र पाहून हा उपवास सोडला जातो. मात्र अनेकांना अजून रमजान ईद म्हणजे नेमकं काय आणि तो का साजरा केला जातो, ह्या बाबत अजून स्पष्टता नाहीय. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला 'रमजान ईद' म्हणजे काय आणि ह्या दिवसाचे महत्व सांगणार आहोत.

'रमजान ईद' म्हणजे काय:

रमजान म्हणजे 'बरकती' आणि ईद म्हणजे 'आनंद'. मनामनातील दरी कमी करुन परस्परांमध्ये स्नेहभाव वाढविणारा हा महिना. ह्याच महिन्यात हजरत मोहम्मद पैगंबरांना त्यांच्या अखंड साधनेचे, खडतर तपश्चर्येंचे फळ मिळाले. अर्थात त्यामुळे त्यांना अल्लाह (मुस्लिमांचा देव) चे दर्शन झाले. मोहम्मद पैगंबर हे इस्लाम धर्माचे संस्थापक होते. इस्लामच्या धारणेनुसार अल्लाहने त्यांच्यामार्फत कुराण हा धर्मग्रंथ लोकांपर्यंत पोहोचवला असे सांगितले जाते. रमजान ईद या दिवसाला 'ईद-उल-फित्र' असेही म्हणतात. फित्र म्हणजे दान करणे. म्हणूनच रमजान ईद च्या दिवशी अन्नाच्या रुपात दान केले जाते. ह्या सर्व गोष्टींमुळे हा महिना आणि हा दिवस मुस्लिम बांधवांसाठी अत्यंत पवित्र आणि मंगलमय असा मानला जातो.

'रमजान ईद' या दिवसाचे महत्त्व:

रमजान महिन्यातील रोजे संपल्यानंतर ईद येते. ईद हा आनंदाचा सण असल्याने ईदच्या दिवसांमध्ये मुस्लिम बांधवांच्या चेह-यावर आनंद खुललेला दिसतो. रमजान ईदच्या मुस्लिम लोक नवीन कपडे परिधान करुन ईदगाह किंवा मशिदीत नमाज पठण करायला जातात. नमाज पठण झाल्यानंतर एकमेकांना आलिंगन देऊन ईदच्या शुभेच्छा देतात.

कशी साजरी करतात रमजान ईद:

रमजानचे पावित्र्य आणि शुभ महिना संपल्यानंतर चंद्रदर्शन होताच शौव्वाल या महिन्याची पहिली तारीख सुरु होते. हा दिवस रमजान ईद म्हणून साजरा केला जातो. या दिवसी दानधर्म केले जाते. ईदच्या दिवशी सकाळी प्रार्थना झाल्यानंतर प्रथम दहिभात आणि साखर यांचे जेवण होते. त्याचवेळी खारीक खाण्याचीही पद्धत आहे. कारण मोहम्मद पैगंबर व त्यांच्या कुटुंबातील लोकांना हाच पदार्थ मुख्यत्वे उपलब्ध होता, अशी समजूत आहे. दुधात शेवया टाकून खीर खाण्याची आणि इतरांना खाऊ घालण्याचीही पद्धत आहे. या वेळी मिठाई आणि शीर खुरमा आवर्जून दिला जातो.

Bharat Trailer: सलमान खान आणि कतरिना कैफच्या दमदार अभिनयाने सजला 'भारत'चा जीवन प्रवास; ईदच्या मुहूर्तावर होणार प्रदर्शित

रमजानचा मुख्य संदेश पुण्य कमवा आणि पापाला जाळा असा आहे. मुस्लिम या शब्दाचा अर्थ अल्लाच्या आज्ञांचे पालन करणारा किंवा शांततेचे रक्षण करणारा असा केला जातो.