यंदाचा गणेशोत्सव अवघ्या 27 दिवसांवर येऊन ठेपला आहे. मुंबई प्रमाणेच पुण्यामध्येही गणेशोत्सवासोबतच गणपती विसर्जनाच्या मिरवणूकीचं देखील भाविकांमध्ये विशेष आकर्षण असतं. मानाच्या 5 गणपतींपाठोपाठ सार्वजनिक गणेशमंडळाचे अनेक मोठे गणपती बाहेर पडतात. यामध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा (Shrimant Dagdusheth Ganpati) देखील समावेश असतो. परंतू हा गणपती मागील अनेक वर्ष अनंत चतुर्दशी (Anant Chaturdashi) दिवशी विसर्जन करू शकत नाही. यंदा मानाच्या पाच गणपतींनंतर दुपारी 4 च्या सुमारास विसर्जनासाठी बाहेर काढला जाईल असं मंडळाचे अध्यक्ष माणिकदादा चव्हाण यांनी आज जाहीर केले आहे.
मानाच्या 5 गणपतींनंतर दुपारच्या वेळेस बेलबाग चौक रिकामा असतो. त्यावेळेस आता दगडूशेठचा गणपती तेथे पोहचेल अशी व्यवस्था केली जाणार आहे. मागील वर्षी सकाळी 7.45 च्या सुमारास दगडूशेठ बेलबाग चौकात आला होता. मिरवणूकांना लागणारा वेळ पाहता भाविकांनाही दर्शनासाठी तिष्ठत उभं राहावं लागतं. त्यांची गैरसोय टाळण्यासाठी दगडूशेठ गणपती लवकर बाहेर काढण्याचा निर्णय झाला आहे. मागील अनेक वर्ष दगडूशेठ हलवाईच्या गणपती बाप्पाची मिरवणूक पहाटे काढली जात असल्याने त्याच्या विसर्जनाला दुसरा दिवस उगवतो. नक्की वाचा: Shrimant Dagdusheth Ganpati 2023 Decoration: पुण्यात दगडूशेठचा गणपती यंदा विराजमान होणार अयोद्धेच्या राम मंदिर प्रतिकृतीमध्ये .
दरम्यान यंदा दगडूशेठ हलवाई गणेशोत्सव मंडळाकडून अयोद्धेच्या श्रीराम मंदिराची प्रतिकृती राम सेतू यांचा देखावा साकारण्यात येणार आहे. 2024 च्या जानेवारी महिन्यात अयोद्धेचं राम मंदिर यंदा भाविकांना खुलं होणार आहे.