यंदा गणेशोत्सवामध्ये पुणेकरांचा लाडका दगडूशेठचा गणपती बाप्पा (Shrimant Dagdusheth Ganpati) अयोद्धेच्या राम मंदिराच्या (Ayodhya Ram Mandir) प्रतिकृती मध्ये विराजमान होणार आहे. आजपासून पुण्यात श्रीराम मंदिराच्या (Shree Ram Mandir) प्रतिकृती साकारण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. 100 कारागिर पुढील 75 दिवसांमध्ये पुण्यात अयोद्धेतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारणार आहेत. जय गणेश प्रांगणाच्या पारंपरिक जागेत उत्सवमंडपात श्रीं ची मूर्ती विराजमान होणार असून भाविकांना श्रीं सोबतच अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराचे देखील दर्शन होणार आहे. प्रभू श्रीरामांच्या मंदिरासोबतच काल्पनिक रामसेतू देखील साकारला जाणार आहे.
पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवा मध्ये दगडूशेठच्या गणपतीला देखील मोठी गर्दी असते. देशा-परदेशातून भाविक बाप्पाच्या दर्शनाला येतात. मागील अनेक वर्ष दगडूशेठ गणपती मंदिराकडूनही गणेशोत्सवाच्या काळामध्ये भव्य देखावे उभारण्यासाठी प्रयत्नशील असतात.
पुण्याचा दगडूशेठ हलवाई ट्रस्टचा गणपती
View this post on Instagram
पुण्यात साकारल्या जाणार्या राम मंदिराच्या प्रतिकृतीचा आकार 125 फूट लांब, 50 फूट रुंद आणि 100 फूट उंच असणार आहे. लाकूड, बॅटम, प्लायवूडचा वापर करून त्यावर रंगकाम केले जाणार आहे. तसेच शेवटच्या टप्प्यात त्यावर दिवे देखील लावले जातील. प्रतिकृतीमध्ये 24 खांब आणि 24 कमानी असतील. मंदिराचा मुख्य घुमट 100 फुटांपेक्षा उंच असून ध्वजासहित सुमारे 108 फूट उंच मंदिर असेल. याशिवाय मंदिराचे छोटे आणि मोठे असे रेखीव 11 कळस देखील असतील. भगवान श्रीराम, प्रवेशद्वारावर श्री हनुमंत आणि वानरसेनेच्या वानरांच्या प्रतिकृती लक्ष वेधून घेतील.