हिंदू धर्मीयांसाठी पवित्र असलेल्या श्रावण महिन्याची सुरूवात यंदा 9 ऑगस्ट पासून होणार आहे. श्रावण महिना म्हणजे सण आणि व्रत- वैकल्यांची रेलचेल असल्याने या महिन्याबद्दलची उत्सुकता अधिक असते. यावर्षी श्रावण महिन्याचा (Shrvan Maas) पहिला दिवस आणि पहिला श्रावणी सोमवार (Shravani Somvar) एकाच दिवशी आहे. त्यामुळे शिव शंकराच्या भक्तांसाठी हा दिवस अधिक खास असणार आहे. श्रावणी सोमवार, मंगळवार, शुक्रवारी खास पूजा करण्याची पद्धत आहे. श्रावणी सोमवार हे व्रत शंकरासाठी असते. या महिन्यात प्रत्येक सोमवारी एक शिवमूठ (Shivmuth) भगवान शंकराला अर्पण करण्याची पद्धत आहे. या वर्षी 5 श्रावणी सोमवार आहेत. Shravan Month 2021 in Maharashtra: महाराष्ट्रात श्रावणमासारंभ 9 ऑगस्ट पासून; श्रावणी सोमवार ते पोळा जाणून घ्या या पवित्र महिन्यातील सण, व्रतांच्या तारखा.
सध्या महाराष्ट्रात कोरोना संकटामुळे अद्याप प्रार्थनास्थळं उघडली नाहीत त्यामुळे भगवान शंकराची मंदिरं बंद आहेत. पण साधारण शंकराच्या आराधनेसाठी श्रावणी सोमवारी पूजा करताना बेल, दूध यांचा शंकराच्या पिंडीवर अभिषेक केला जातो. त्यानंतर शिवमूठ अर्पण केली जाते. मग यंदा पाच श्रावणी सोमवारी पहा कोणत्या दिवशी कोणती शिवमूठ आहे?
श्रावणी सोमवार 2021 शिवमूठ वेळापत्रक
पहिला श्रावणी सोमवार - 9 ऑगस्ट 2021 - तांदूळ शिवमूठ
दुसरा श्रावणी सोमवार - 16 ऑगस्ट 2021 - तीळ शिवमूठ
तिसरा श्रावणी सोमवार - 23 ऑगस्ट 2021 - मूग शिवमूठ
चौथा श्रावणी सोमवार - 30 ऑगस्ट 2021 - जव शिवमूठ
पाचवा श्रावणी सोमवार - 6 सप्टेंबर 2021 - सातू शिवमूठ
श्रावण महिना हा चातुर्मासामधील सर्वात श्रेष्ठ आहे. अनेक शिवभक्त प्रत्येक श्रावणी सोमवारी उपवास ठेवतात. एक वेळेस जेवण करून संध्याकाळी व्रत सोडलं जातं. समुद्रमंथन झाल्यानंतर त्यामधून बाहेर पडलेले हलाहल विष शंकराने प्राशन करून मनुष्यांवरील धोका टाळला. त्यामुळे भगवान शंकराचे मनुष्य वर्गावर असलेले हे ऋण फेडण्यासाठी श्रावणी सोमवारी विशेष पूजा करून त्याच्याप्रती आदर व्यक्त केला जातो. अशी देखील धारणा आहे.
(टीप- सदर लेख हा केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने लिहण्यात आलेला आहे. या लेखातील मतांचे लेटेस्टली कोणत्याही प्रकारचे समर्थन करत नाही.)