Shivrajyabhishek Din 2021: हिंदवी स्वराज्याची स्थापना करुन अवघ्या महाराष्ट्राचे दैवत झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा दरवर्षी 6 जून रोजी किल्ले रायगडावर साजरा होतो. शिवरायांचा राज्याभिषेक 6 जून 1674 दिवशी झाला. त्यामुळे दरवर्षी 6 जून रोजी तारखेप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जातो. तर ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी दिवशी तिथीप्रमाणे राज्याभिषेक सोहळा साजरा होतो. दरवर्षी शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. मात्र यंदा पासून हा सोहळा 'शिवस्वराज्य दिन' म्हणून साजरा करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचावे म्हणून हा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा अत्यंत दैदिप्यमान होता. यात राजाचा अभिषेक आणि डोक्यावर छत्र धरणे हे दोन मुख्य विधी पार पडले. यावेळी शिवाजी महाराजांनी शुभ्र वस्त्र परिधान केले होते. गळ्यात फुलांच्या माळा घातलेल्या होत्या. हाताची करंगळी कापून रक्ताचा अभिषेक शिवपिंडीवर करुन महाराजांना हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली. गागाभट्ट आणि इतर ब्राह्मणांनी मंत्रोच्चारण करत शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा केला. त्यानंतर 32 मण सोन्याने सजवलेल्या भव्य सिंहासनावर महाराज आरुढ झाले. प्रजेनी महाराजानाआशीर्वाद दिला. ’शिवराज की जय’ शिवराज की जय’ च्या घोषणा दिल्या गेल्या. सोन्याचांदीचे फुले उधळली गेली.
सोहळा इतक्यावरच थांबला नाही तर दुसऱ्या दिवशी महाराजांची सोने, चांदी, तांबे, जस्त, कथील, शिसे आणि लोखंड अशा सात धातूंनी वेगवेगळी तुला झाली. याशिवाय वस्त्र, कापूर, मीठ, खिळे, मसाले, लोणी, गुळ, फळे इत्यादींच्या देखली तुला करण्यात आल्या.
राज्याभिषेकादिवशी शिवरायांना 'शिवछत्रपती' होण्याचा सन्मान मिळाला. या दिवशी रायगड शिवभक्तांनी सजतो. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अपर्ण करुन स्रागसंगीत पूजन होते. इतर कार्यक्रम पार पडतात. मात्र यंदा कोरोना व्हायरस संकटामुळे मोठ्या प्रमाणावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करता येणार नाही.