Navratri 2024| File Image

Shardiya  Navratri 2024 Ten Days To Colours:  शारदीय नवरात्रीची सुरूवात यंदा 3 ऑक्टोबर पासून होणार आहे. स्त्री शक्तीचा जागर करणारा हा सण देशभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. महाराष्ट्रात या शारदीय नवरात्रीमध्ये नऊ दिवसात नऊ रंग परिधान करण्याची महिलावर्गामध्ये विशेष क्रेझ असते. त्यासाठी अनेकजणी खास तयारी करतात. मग यंदा नवरात्री मध्ये नेमका कोणत्या दिवशी कोणता रंग आहे? हे जाणून घेण्याची तुम्हांलाही उत्सुकता आहे तर मग पहा यंदाच्या नवरात्रीचे रंग कोणते? यंदाची नवरात्र 3 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर आहे त्यामुळे नवरात्रीचे नऊ दिवस आणि दसर्‍याचा दहावा दिवस असे मिळून 10 दिवसांच्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या तारखा आणि त्याच्या रंगाचे वेळापत्रक आता समोर आले आहे. नवरात्रीची सुरूवात गुरूवार पासून होणार असल्याने पिवळा रंग पहिला आहे. तर  दसर्‍याला सांगता मोरपिशी रंगाने होणार आहे.

नवरात्री मध्ये विशिष्ट दिवशी विशिष्ट रंग परिधान करण्यामागे कोणताही धार्मिक संकेत नाही. पण हा सण मूळात महिला शक्तीच्या जागराचा असल्याने त्यांच्यामध्ये  एकाच रंगाची वस्त्रे परिधान केल्याने समानतेची, एकतेची आणि सुरक्षिततेची भावना निर्माण होण्यास मदत होते. तसेच सर्वांनी एकाच रंगाची वस्त्रे नेसल्याने प्रत्येकीला होणारा आनंदही खास असतो त्या उद्देशाने हा नवरात्री नऊ रंगांची संकल्पना पुढे आली आहे.

नवरात्री 2024 मधील नऊ रंग कोणते? 

 

तारीख  वार  रंग 
दि.3 ऑक्टोबर गुरुवार पिवळा
दि.4 ऑक्टोबर शुक्रवार हिरवा
दि.5 ऑक्टोबर शनिवार करडा
दि.6 ऑक्टोबर रविवार  केशरी
दि.7 ऑक्टोबर सोमवार पांढरा
दि.8 ऑक्टोबर मंगळवार लाल
दि.9 ऑक्टोबर बुधवार निळा
दि.10 ऑक्टोबर गुरुवार गुलाबी
दि.11 ऑक्टोबर शुक्रवार जांभळा
दि.12 ऑक्टोबर शनिवार मोरपिशी

शारदीय नवरात्री 2024 मुहूर्त

शारदीय नवरात्रीचा पहिला दिवस हा घटस्थापनेचा असतो. या दिवशी महिला घरात घटाची स्थापना करतात. यामध्ये नऊ धान्यांचा समावेश असतो. प्रत्येक दिवशी एक नवी माळ लावली  जाते.  3 ऑक्टोबरला घटस्थापनेच्या दिवशी घट स्थापन करण्याचा मुहूर्त  सकाळी 06:15 ते 07:22 पर्यंत आहे. त्याच वेळी, अभिजीत मुहूर्त सकाळी 11:46 ते दुपारी 12:33 पर्यंत आहे.

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना करून देवींना आवाहन करून 9 दिवस तिची पूजा केली जाते. काही भक्त हे 9 दिवस अनवाणी चालतात. व्रत ठेवतात. केवळ फलाहार करतात आणि दसर्‍याच्या दिवशी व्रत सोडतात.

टीप- सदर लेख केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने लिहण्यात आलेला आहे. लेटेस्टली यामधील कोणत्याही गोष्टीची पुष्टी करत नाही. अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा कोणताही हेतू नाही.