
आज 3 जानेवारी. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांची 190 वी जयंती. सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे 3 जानेवारी 1831 रोजी सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला. अठारव्या शतकात अगदी स्त्री शिक्षणासाठी अतिशय प्रतिकूल परिस्थिती असताना त्यांनी पती जोतीराव फुले यांच्या आग्रहाने, सहकार्याने आपले शिक्षण पूर्ण केले आणि इतक्यावर त्या थांबल्या नाहीतर शिक्षण क्षेत्रात त्यांनी भरीव कामगिरी केली. महिला शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले यांनी केलेले कार्य, त्याग लक्षात घेऊनच क्रांतीज्योती सावित्रीबाईंचा जयंती दिवस 'महिला शिक्षण दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सावित्रीबाई फुले यांच्या कार्याबद्दल जाणून घेऊया काही खास गोष्टी: (Savitribai Phule Jayanti 2021 Images: सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त WhatsApp Status, Facebook Messages शेअर करत अर्पण करा आदरांजली!)
# 1848 मध्ये सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी भिडेवाड्यात शाळा सुरु केली. ती भारतातील मुलीसाठीची पहिली शाळा होती. याच शाळेत त्यांनी शिक्षिका आणि पुढे मुख्याध्यापिका म्हणून काम पाहिले. त्यानंतर त्यांनी मुलींसाठी तब्बल 18 शाळा सुरु केल्या.
# पहिल्या महिला शिक्षिका आणि मुख्याध्यापिका होण्याचा मान त्यांनी मिळवला.
# केवळ शिक्षिका म्हणून नाही तर कवयित्री आणि समाजसुधारक म्हणूनही त्यांची ओळख आहे.
#अवघ्या 9 वर्षांच्या असताना सावित्रीबाईंचा ज्योतिबा फुलेंशी विवाह झाला.
#स्त्रीभ्रूणहत्या रोखणे आणि इतरही सामाजिक सुधारणांसाठी सावित्रीबाई यांनी खूप प्रयत्न केले.
# त्यांच्या या सामाजिक कार्यामुळे 1955 पासून सावित्रीबाईंचा जन्मदिवस 'बालिकादिन' म्हणून साजरा केला जातो.
# ‘काव्यफुले’, ‘बावनकशी', सुबोध रत्नाकर’ हे त्यांनी लिहिले काव्यसंग्रह.
# जोतिरावांनी सुरु केलेले बालहत्या प्रतिबंधक गृह सावित्रीबाई यांनी समर्थपणे चालवले. तेथील सर्व अनाथ बालकांना त्यांनी आपल्या मुलांप्रमाणेच वाढवले. तेथेच जन्मलेल्या काशीबाई या ब्राह्मण विधवा महिलेचे बाळ त्यांनी दत्तक घेतले. त्याला 'यशवंत' असे नाव ठेवले.
जोतिबांच्या प्रत्येक कार्यात हिरीरीने भाग घेणाऱ्या सावित्रीबाईंचे 'स्त्रियांनी शिकावे' हेच ब्रीदवाक्य होते. 1897 साली आलेल्या प्लेगच्या भयंकर साथीत त्यांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता काम केले. अखेर प्लेगची लागण होऊन त्यांचा मृत्यू झाला.