3 जानेवारी रोजी, आशिया खंडामध्ये पहिली मुलींची शाळा सुरु करून नवी क्रांती घडवणाऱ्या, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, शिक्षिका, कवयित्री व समाजसुधारक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांची जयंती साजरी केली जाते. याच दिवसाचे औचित्य साधून, महाराष्ट्र सरकार दरवर्षी 3 जानेवारीला सावित्रीबाई फुले यांची जयंती ‘सावित्री उत्सव’ (Savitri Utsav) म्हणून साजरी करणार आहे. शनिवारी राज्याच्या महिला व बालविकास विभागाने याबाबत अधिसूचना जारी केली. राज्य महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) म्हणाल्या, ‘या दिवशी सावित्रीबाई फुले यांच्या कामांबद्दल लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी राज्याच्या विविध भागात कार्यक्रम आयोजित केले जातील.’
सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला होता. पुढे 9 व्या वर्षी त्यांचा विवाह झाला त्यावेळेस त्या शिक्षीत नव्हत्या पण लग्नानंतर पती ज्योतीबांनी त्यांना लिहायाला वाचायला शिकविले. त्याकाळी चालू असलेल्या रुढी-परंपरा व कर्मकांड, अस्पुश्यांचा होत असलेला रागद्वेश पाहून ज्योतीबांनी समाजात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवायची ठरवली. याला साथ मिळाली ती त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले यांची. सावित्रीबाईंनी आपले पती ज्योतीराव फुले यांच्या समवेत महिला सबलीकरणामध्ये विशेषत: शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
सावित्रीबाईंनी 1848 साली, शिक्षणाचे माहेर घर असे ज्याला आपण म्हणतो त्या पुण्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली. ही शाळा म्हणजे भारतातील मुलींकरता सुरू होणारे पहिले महाविद्यालय ठरले. येथे एकुण 9 मुलींनी प्रवेश घेतला, सावित्रीबाई या शाळेच्या मुख्याध्यापिका देखील बनल्या आणि अश्या तऱ्हेने त्या देशाच्या पहिल्या शिक्षीका ठरल्या.
पुढे पती ज्योतिबा फुले यांच्या मदतीने कुणाचेही आर्थिक सहाय्य न घेता 1 जानेवारी 1848 पासुन 15 मार्च 1852 पर्यंत मुलींच्या शिक्षणाकरता त्यांनी 18 शाळा सुरू केल्या. अशा प्रकारे स्त्री शिक्षणामध्ये भरीव कामगिरी करून त्या इतिहासात अजरामर ठरल्या. सन 1897 मध्ये त्यांचे निधन झाले.