Lord Ganesha | Sankashti Chaturthi | (Photo Credits: Pixabay)

Sankashti Chaturthi 2019: आज संपूर्ण राज्यात संकष्टी चतुर्थी (Sankashti Chaturthi 2019) साजरी केली जात आहे. या दिवशी अनेक गणेशभक्त दिवसभर उपवास करत असतात. असे मानले जाते की, संकष्टीचे व्रत केल्याने गणपती बाप्पा प्रसन्न होतात. आपल्या घरात कोणतीही पूजा असेल तर सर्वात अगोदर गणपतीची पूजा केली जाते. गणेशाची मूर्ती किंवा सुपारीला गणेशमूर्ती समजून बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना केली जाते. असे असले तर प्रत्येक महिन्यात येणारे चतुर्थीचे व्रत महत्त्वाचे असते. गणेश देवता ही लहानापासून मोठ्यापर्यंत आवडीची देवता समजली जाते. लहान मुलांना तर गणेशाचे विशेष आकर्षण असते. त्यामुळे चतुर्थीच्या दिवशी अगदी गणपती बाप्पाच्या आरतीपासून ते नवैद्यापर्यंत त्यांची धावपळ असते. (हेही वाचा - Sankashti Chaturthi 2019: संकष्टी चतुर्थीनिमित्त 'अशी' करा पूजा, जाणून घ्या श्रीगणेशाला प्रसन्न करण्याचे उपाय)

संकष्टी चतुर्थी दिवशी चंद्र दर्शन शुभ मानलं जातं. त्यामुळे दिवसभराचा उपवास हा चंद्रोदयानंतर सोडला जातो. असं केल्याने मनातील इच्छा पूर्ण होण्यास मदत होते. आज पंचांगानुसार, रात्री 8.23 मिनिटांनी चंद्रोदयाची वेळ सांगण्यात आली आहे. आज आपण संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपती बाप्पाच्या काही खास आवडत्या गोष्टींविषयी जाणून घेऊयात. या गोष्टी तुम्ही बाप्पाला अर्पण केल्यास गणपती बाप्पा तुमच्यावर नक्की प्रसन्न होतील.

हेही वाचा - Sankashti Chaturthi November 2019: संकष्टी चतुर्थी दिवशी असे करा श्रीगणेशाचे व्रत; काय आहे आजची चंद्रोदयाची वेळ जाणून घ्या सविस्तर

गणपती बाप्पाच्या आवडत्या गोष्टी -

मोदक (Modak) -

गणपतीला सर्वात प्रिय असणारा नैवेद्य म्हणजे मोदक. गणपतीला 11 किंवा 21 मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो. हे मोदक नारळाचं सारण आणि तांदळाच्या उकडीने तयार केला जातात. सध्या तर मोदकांमध्ये अनेक व्हरायटी उपलब्ध आहेत. त्यामुळे तुमच्या लाडक्या बाप्पाला संकष्टी चतुर्थीला मोदकाचा नवैद्य नक्की दाखवा.

दुर्वा (Durva)

गणपतीची पूजा करताना नेहमी दुर्वांची जुडी वाहिली जाते. कारण, बाप्पाला दुर्वा अतिप्रिय आहेत. दुर्वा अर्पण केल्याने गणपती प्रसन्न होतो. गणपतीला नेहमी 21 दुर्वांची जुडी वाहिली जाते. या मागे एक आख्यायिका आहे. अनलासूर नावाच्या एका असुराने स्वर्ग आणि पृथ्वीवर उच्छाद मांडला होता. त्याच्यापासून सुटका व्हावी म्हणून गणेशाला गाऱ्हाणे घालण्यात आले. बाप्पाने त्या अनलासूराला गिळले आणि सर्वांचा त्रास संपला. परंतु, त्या राक्षसाला गिळल्यामुळे गणपतीच्या पोटात प्रचंड आग सुरू झाली. ही आग काही केल्या थांबेना. यावर कश्यप ऋृषींनी बाप्पाला दुर्वांचा रस प्यावयास दिला. तो प्राशन केल्यावर गणपतीच्या पोटातील आग थांबली. त्यामुळे गणपतीला दुर्वा वाहिल्या जातात.

जास्वंद (Jaswandi)

दुर्वांप्रमाणेच गणपतीला जास्वंदाचे लाल फूल आवडते. कारण, गणपतीचा वर्ण शेंदरी किंवा लाल आहे. त्यामुळे गणपती पूजेत जास्वंदाच्या लाल फुलाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे गणपतीला जास्वंदीच्या फुलांचा हार वाहिला जातो.

​झेंडूची फुले -

गणपतीला झेंडूची फुले फार आवडतात. जर गणेश चतुर्थीला तुम्ही गणेशमूर्तीची स्थापना करणार असाल तर, दररोज गणपतीला हार करताना झेंडूची फुले त्यात माळा. असे केल्यास बाप्पा आपल्यावर प्रसन्न होतो.

​केळी -

गणपतीला फळांमध्ये केळी सर्वाधिक प्रिय आहेत. गणपतीला केळ्यांचा प्रसाद दाखविताना केळ्यांचा घड असायला हवा. केळीचे एक फळ पूर्ण मानले जात नाही.

​​शंख -

गणपतीच्या चार हातांपैकी एका हातात शंख आहे. गणपतीच्या पूजेत शंखनाद करणे आवश्यक आहे, म्हणून आरती करताना शंखनाद केला जातो. शंखनाद केल्याने गणपती प्रसन्न होतो.

गणपती या देवतेची लोकप्रियता जगभरात आढळते. भारतासोबतच विदेशातही गणेश चतुर्थी आणि गणेशोत्सव साजरा केला जातो. भारतातून गणपतीच्या मूर्ती विदेशात पाठवल्या जातात. तिथे त्यांची प्रतिष्ठापना करून गणेश चतुर्थी पारंपारिकरित्या उत्साहात साजरी केली जाते.