Sankashti Chaturthi 2019: हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्याची सुरूवात श्री गणेशाची पूजा करुनच केली जाते. प्रत्येक महिन्यांत दुसर्या पंधरवड्यात वद्य चतुर्थीच्या दिवशी 'संकष्टी चतुर्थी' (Sankashti Chaturthi 2019) व्रत केले जाते. या दिवशी श्रीगणपतीचा उपवास केला जातो. या दिवशी उपवास करून रात्री चंद्रोदयाच्या वेळी श्रीगणपतीची पूजा केली जाते. त्यानंतर चंद्रदर्शन घेऊन उपवास सोडवला जातो. याप्रकारे हे व्रत केले जाते. तसेच आश्विन महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला 'करवा चौथ' व्रत देखील केलं जातं. विवाहित महिला हे व्रत करतात. या दिवशीही स्त्रिया दिवसभर उपाशी राहून आपल्या पतीच्या दिर्घायुष्याची तसेच सुख-समृद्धीची प्रार्थना करतात. या दिवशी संध्याकाळी चंद्राची पूजा करुन उपास सोडण्याचा नियम आहे. (हेही वाचा - Sankashti Chaturthi November 2019: संकष्टी चतुर्थी दिवशी असे करा श्रीगणेशाचे व्रत; काय आहे आजची चंद्रोदयाची वेळ जाणून घ्या सविस्तर)
संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची पूजा केल्यास सुख-समृद्धी, शांती लाभते. तसेच श्रीगणेश आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. त्यामुळे बाप्पाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी प्रत्येकाला संपूर्ण विधीने श्रीगणेशाची पूजा करणे आवश्यक आहे. चला तर मग संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेशाची पूजा कशी करावी आणि बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी कोणते उपाय करावे, हे जाणून घेऊयात...
या पद्धतीने पूजा केल्यास गणपती बाप्पा होतील प्रसन्न -
संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सुर्योदयापूर्वी उठून स्वच्छ पाण्याने आंघोळ करावी आणि लाल रंगाचे कपडे परिधान करावेत. दुपारच्या वेळी घरातील देवघरात सोनं, चांदी, माती, तांबी किंवा पितळ्याची गणपतीची मुर्तीची प्रतिष्ठापना करावी. त्यानंतर श्रीगणेशाची पूजा करुन आरती करावी. यानंतर संकष्ट चतुर्थी महात्म्य वाचावे.
त्यानंतर चंद्रोदयानंतर चंद्रदर्शन करुन चंद्राला गंध, पाणी, अक्षता, फुले वाहावी. त्यानंतर श्रीगणेशाच्या मुर्तीवर सिंदूर लावा आणि 'ॐ गं गणपतेय नम:' या मंत्राचा जप करत 21 दुर्वा अर्पण करा. बाप्पाला 21 मोदकांचा नैवेद्य दाखवावा. असे केल्याने गणेश आपल्या भक्तांवर प्रसन्न होतात. तसेच आपल्या घरात नेहमी सुख, समृद्धी आणि शांती नांदते. आज संपूर्ण राज्यात संकष्टी चतुर्थीचे व्रत ठेवले जाते. पंचांगानुसार, रात्री 8.23 मिनिटांनी चंद्रोदयाची वेळ सांगण्यात आली आहे. (सूचना: वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारित आहे. यास सल्ला समजू नये. लेटेस्टली मराठी त्या मजकूराची पुष्टी करत नाही.)