Chhatrapati Sambhaji Raje Maharaj statue and painting | (Photo Credits: Wikimedia)

 Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2020: शिवाजी महाराज यांचे मोठे सुपुत्र संभाजी महाराज यांचा जन्म 14 मे 1657 रोजी झाला होता. त्यांच्या आईचे नाव सईबाई होते. संभाजी राजे केवळ 2 वर्षांचे असताना सईबाईंचा मृत्यू झाला होता. त्यामुळे संभाजी राजेंचे पालन पोषण त्यांच्या आजी जीजाऊंनी केले. संभाजी महाराज हे स्वतः शुर योद्धा आणि उत्तम राजा होते. असे म्हटले जाते की, संभाजी महाराजांनी 150 पेक्षा अधिक युद्ध लढले असून त्यापैकी एकामध्ये देखील त्यांना शरणागती पत्करावी लागली नाही. संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी दिलेल्या बलिदानाने त्यांचे श्रेष्ठत्व सिद्ध होते. अशा या पराक्रमी, बुद्धिमानी राजाची उद्या जयंती. संभाजी राजांच्या जयंती निमित्त जाणून घेऊया मराठा साम्राज्याच्या दुसर्‍या छत्रपतींंविषयी खास गोष्टीः (Sambhaji Maharaj Jayanti 2020 Wishes: संभाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा मराठी संदेश, SMS, Messages, Images च्या माध्यमातून Facebook, WhatsApp द्वारा शेअर करून साजरा करा छत्रपती शंभुराजेंचा जन्मसोहळा!)

# अवघ्या 9 वर्षांचे असताना संभाजी राजे यांना अंबरचा राजा जयसिंग याच्याकडे राजकीय हेतूंसाठी ओलिस ठेवण्यात आले होते.

# संभाजी महाराजांना लहानपणापासून उत्तम शिक्षण मिळावे याची काळजी शिवाजी महाराजांनी वडील म्हणून घेतली होती. त्यासाठी संभाजी महाराज यांना लहानपणापासूनच शास्त्र आणि शस्त्र ज्ञान देण्यात आले.

# कोकणच्या किनारपट्टीवर कब्जा मिळवण्यासाठी शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांचे लग्न जीवूबाई यांच्याशी लावून दिले. त्यांचे लग्नानंतरचे नाव येसूबाई असे आहे.

# संभाजी महाराजांना वयाच्या 15 वर्षापर्यंत संस्कृत,  पोर्तुगिज यांसारख्या एकूण 13 भाषा येत होत्या.

# संभाजी महाराजांनी कवी कलश यांची मुख्य सल्लागार पदी नियुक्ती केली होती.

# संभाजी महाराजांना जेव्हा कळले की, सोयराबाईंनी त्यांच्या 10 वर्षाच्या मुलाला राजाराम यांना मराठा राज्याचा वारस म्हणून मुकूट घातला. तेव्हा त्यांनी पन्हाळा किल्ला आधी काबिज केला आणि मग 20 हजार सैन्यांसह रायगडावर स्वारी करत औपचारिकपणे सिंहासनावर ताबा मिळवला.

# मुघल राजा अकबर याने जेव्हा आपल्या वडीलांविरुद्ध बंड पुकारले तेव्हा अकबर यांनी संभाजी महाराजांसोबत आश्रय घेतला. या गोष्टीने अकबर बादशाहचे वडील औरंगजेब फार दुखावले गेले आणि त्यानंतर त्यांनी संभाजी महाराज यांना पकडत नाही तोपर्यंत मी राजमुकूट घालणार नाही असे ठरवले.

# संभाजी महाराज यांनी सुमारे 150 युद्ध लढले असून त्यांना एका युद्धात देखील हार पत्करावी लागली नाही.

# संभाजी आणि त्यांचे सल्लागार कवी कलश  हे एका गुप्त मार्गाने जात असल्याची माहिती गानोजी शिर्के यांनी औरंगजेबांला दिली. त्या माहितीच्या आधारे 9 वर्षे संभाजी महाराजांकडून पराभव पत्कऱ्यानंतर औरंगजेबाने त्यांना कैद केलं.

# संभाजी महाराजांना मारण्याचे आदेश देण्यापूर्वी औरंगजेब असा म्हणाला की, "मला जर संभाजी सारखा मुलगा असता तर मी दख्खनचे साम्राज्य संपूर्ण भारतावर उभे केले असते."

# संभाजी महाराज यांची 11 मार्च 1689 रोजी वयाच्या 31 व्या वर्षी हत्या करण्यात आली. त्यांच्यावर वाघनखाने हल्ला करुन नंतर त्यांच्या शरीराचे कुऱ्हाडीने तुकडे करुन पुण्याजवळील भीमा नदीच्या किनाऱ्यावर टाकण्यात आले. काही वेळाने वाळू गावातील लोकांनी संभाजी महाराजांच्या देहाचे तुकडे एकत्र करुन त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.

संभाजी महाराजांवर असंख्य अत्याचार होऊन देखील त्यांनी औरंगजेबापुढे दयायाचना केली नाही. यातूनच त्यांचे श्रेष्ठत्व सिद्ध होते. जगावे कसे हे आपण शिवाजी महाराजांकडून शिकलो तर मरावे कसे हे आपल्याला संभाजी महाराजांनी दाखवून दिले.