'राम राम जय राजाराम, राम राम जय सीताराम' असे म्हणत संकटसमयी आपण ज्याचा धावा करतो त्या प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्म चैत्र शुद्ध नवमी ला म्हणजेच रामनवमी झाला. या दिवशी भर दुपारी 12 वाजता प्रभू श्रीरामांचा जन्म झाला. या दिवशी भक्त प्रभू रामांचा जयजयकाराने सर्व आसंमत दुमदुमून टाकतात. या दिवशी प्रभू रामांची कृपा आपल्यावर सदैव राहो यासाठी या दिवशी उपवास करतात. या दिवशी रामाची मुर्ती किंवा फोटो यांची साग्रसंगीत पूजा केली जाते. दुपारी 12 वाजता श्रीरामाची मुर्ती पाळण्यात ठेवून पाळणा गायला जातो. यानिमित्ताने भजन-कीर्तनाचे आयोजन केले जाते. यंदा ही रामनवमी 2 एप्रिल ला आली आहे.
पृथ्वीवर जसजसे पाप वाढू लागले तेव्हा भगवान विष्णूंनी रामाचा अवतार धारण करुन पृथ्वीवर जन्म घेतला. म्हणून श्रीरामांना विष्णूचा सातवा अवतार म्हणतात. म्हणूनच या दिवशी मनोभावे रामाच्या मूर्तीची अथवा फोटो ची पूजा करुन हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी श्रीरामांची पुढे दिलेल्या पद्धतीनुसार झाली तर त्यांचे चांगले त्या भक्तास मिळते असे शास्त्रात सांगितले जाते.
1. व्रताच्या एक दिवस आधी सकाळी लवकर उठून स्नान करुन श्रीरामांचे नामस्मरण करावे.
2. रामनवमी दिवशी सकाळच्या प्रहरी उठून घर स्वच्छ करावे आणि आपले दैनंदिन कार्यक्रम लवकर उरकून घ्यावेत.
3. त्यानंतर घरात शुद्ध पाणी अथवा गोमूत्र शिंपडावे
4. रामाच्या मंत्रांनी दिवसाची सुरुवात करावी तसेच तुम्ही या दिवशी रामरक्षा ही बोलू शकतात.
5. त्यानंतर घराला तसेच देवघराला फुलांचे तोरण लावावे.
6. घराच्या उत्तर भागात रंगीत मंडप टाकून त्यात सर्वतोभद्रमंडलाची रचना करून त्याच्या मध्यभागी विधीपूर्वक कलश स्थापन करावा.
7. कलशावर रामपंचायतन त्यामध्ये राम-सीता, दोन्ही बाजूला भरत आणि शत्रुघ्न, लक्ष्मण आणि पदचरणी हनुमानाच्या सोन्याच्या मूर्ती किंवा चित्राची प्रतिष्ठापना करावी आणि त्यांची पूजा करावी.
रामनवमीला पूर्ण दिवस उपवास धरुन दुस-या दिवशी दशमीला व्रत सोडावे. असे केल्यास मानसिक समाधान मिळते आणि प्रभू कायम आपल्यावर कृपादृष्टी राहते असे पुराणात म्हटले आहे.