Ram Navami 2020 Date: राम नवमी यंदा 2 एप्रिल दिवशी; जाणून घ्या रामजन्मोत्सव पूजेची वेळ, तिथी आणि महत्त्व
Ram Navami 2020| Phhoto Credits: Facebook

Ram Navami 2020  Tithi Dates: हिंदू धर्मीयांसाठी राम नवमी हा एक महत्त्वाच्या सणांपैकी आहे. प्रभू रामचंद्रांचा जन्मदिवस म्हणून राम नवमी साजरी केली जाते, हिंदू नववर्षाची सुरूवात चैत्र पाडव्यादिवशी होते. या नववर्षातील पहिल्या महिन्यात म्हणजे चैत्र शुद्ध नवमी दिवशी राम नवमी साजरी करण्याची प्रथा आहे. चैत्र पाडव्यापासून सुरू होणारा चैत्र नवरात्रीचा सण देखील या राम नवमी दिवशी संपतो. त्यामुळे या चैत्र नवमीला अनेक खास कार्यक्रमांचे आयोजन देखील केले जाते. यंदा ही राम नवमी ग्रेगेरियन कॅलेंडरनुसार गुरूवार, 2 एप्रिल 2020 दिवशी साजरी केली जाणार आहे.

भगवान श्रीराम हे विष्णूचे सातवे अवतार आहेत अशी रामभक्तांची धारणा आहे. राजा दशरथ आणि राणी कौसल्या यांच्या पोटी रामाचा अयोद्धेमध्ये जन्म झाला. धार्मिक कथांनुसार श्री प्रभु रामचंद्रांचा जन्म त्रेता युगामध्ये झाला. राम नवमीच्या निमित्ताने त्यांची पूजा केल्यास सारी अमंगल, विनाशी वृत्ती, विचार यांचा नाश होऊन आपण सकारात्मकेतेकडे जातो. मुंबई: कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर वडाळ्याच्या राम मंदिराकडून यंदाचा राम नवमी उत्सव कार्यक्रमामध्ये बदल; ब्रम्ह रथोत्सव रद्द.  

राम नवमी पूजा विधी वेळ

राम नवमी देशभरात साजरी करताना राम जन्माची वेळ ही मध्यान्ह असल्याने दुपारीच्या बाराच्या वेळेस पाळणा गाऊन राम जन्मोत्सव साजरा केला जातो. मात्र द्रिक पंचांगानुसार 2 एप्रिल 2020 दिवशी साजरी होणारी रामनवमी दुपारी 11 वाजून 56 मिनिटं ते दुपारी 2 वाजून 35 मिनिटं या वेळेत साजरी केली जाऊ शकते. या 2 तास 38 मिनिटांच्या काळात राम जन्मोत्सवाचा कार्यक्रम केला जाऊ शकतो.

राम नवमी 2020 तिथी

यंदा राम नवमी तिथी नुसार, 1 एप्रिल 2020 दिवशी रात्री 11.10 ला सुरू होऊन 2 एप्रिलला रात्री 10 वाजून 13 मिनिटांनी संपणार आहे.

राम नवमी दिवशी प्रभू श्रीरामाचे भक्त त्याची आराधना करण्यासाठी एक दिवस उपवास करतात. राम नवमीच्या दिवसापासून दुसर्‍या दिवसापर्यंत तो पाळला जातो. दरम्यान प्रभू रामचंद्राची उपासना करताना भजन, श्रीरामाची गाणी, पाळणे, गीत रामायण गायलं जातं. सादर केलं जातं. काही ठिकाणी राम नवमी निमित्त रथ यात्रांचं आयोजन केलं जातं. राम-सीता स्वयंवर नाटुकलीच्या स्वरूपात सादर केलं जातं. मात्र यंदा कोरोना व्हायरसचं सावट असल्याने राम जन्मोत्सव देखील घरगुती आणि अत्यंत साध्या स्वरूपात साजरा केला जाणार आहे.