महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा वाढता धोका पाहता आता सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्याचं आवाहन सरकार कडून करण्यात आलं आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर राज्यासह देशभरातील महत्त्वाची देवस्थानं, धार्मिक स्थळं बंद करण्यात आली आहेत. सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांना देखील बंदी घालण्यात आल्याने त्याचा परिणाम गुढीपाडवा, राम नवमी अशा सणांवर झाला आहे. मुंबई मधील वडाळा परिसरात असलेल्या राम मंदिराकडूनही यंदा राम नवमी उत्सव छोट्या स्वरूपात साजरा करण्याचं जाहीर करण्यात आलं आहे. दरम्यान राम मंदिर प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार 25 मार्च ते 2 एप्रिल दरम्यान आयोजित कार्यक्रम यंदा भव्य स्वरूपात साजरे केले जाणार नाहीत. महा प्रसाद, अन्न दान सेवा, संगीत आणि नृत्याचे कार्यक्रम यंदा रद्द केले जाणार आहेत. तर दरवर्षी राम नवमीला होणारा ब्रम्ह रथोत्सव यंदा रद्द करण्यात आला आहे. यावर्षी 2 एप्रिलला हा राम नवमी असल्याने रथोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. Coronavirus: कोरोनामुळे भक्तांना मंदिरात प्रवेश नाही! आता देहूचे तुकोबा तर, आळंदी येथील माऊली मंदिर 31 मार्च पर्यंत राहणार बंद.
भारतामध्ये 148 तर राज्यात 42 जण कोरोनाबाधित असून 3 जणांचा बळी घेणारा COVID 19 हा भयंकर आजार आता गंभीर स्वरूप धारण करण्यापूर्वीच त्याला रोखण्यासाठी नागरिकांना अनवश्यक गर्दी आणि प्रवास टाळण्याचा सल्ला भारत सरकार, आरोग्य प्रशासनाकडून देण्यात आला आहे. अद्याप कोरोनाला रोखण्यासाठी कोणताची ठोस उपचार, लस उपलब्ध नाही. त्यामुळे खबरदारीचे उपाय अवलंबले जात आहेत.
महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नागपूरमध्ये कलम 144 लागू करण्यात आल्याने जमावबंदी आहे. त्यापार्श्वभूमीवर कोरोनाला रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून मुंबईतील प्रभादेवी परिसरातील श्री सिद्धीविनायक मंदिर, पुण्याचे दगडूशेठ मंदीर, शिर्डीचे साईबाबा मंदिर, तुळजाभवानी मंदिर, कोल्हापूरचं अंबाबाई मंदिर, ज्योतिबा मंदिर, पंढरपूरचं विठ्ठल रखुमाई मंदिर बंद करण्यात आले आहे.