महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रादुर्भाव आणि संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने उपाययोजना करणे आवश्यक झाले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये, म्हणून सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये अथवा गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन राज्य सरकारकडून नागरिकांना वारंवार करण्यात येत आहे. तसेच कोरोना व्हायरसचा राज्यावरील वाढता विळखा पाहता आता प्रशासनाकडून कडक पाऊले उचलण्यास सुरूवात झाली आहे. दरम्यान राज्य सरकार कडून गर्दी टाळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. राज्यातील सर्व धार्मिक स्थळे बंद करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शिर्डीचे साईबाबा, कोल्हापूरच्या आंबाबाईचे मंदिर 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात आली आहेत. यातच देहू येथील तुकोबा तर, आळंदीचे माऊली मंदीरही 31 मार्च पर्यंत बंद राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्रातही कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भात पाहून राज्यातील शाळा, महाविद्यालय, सिनेमागृह बंद ठेवण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर धार्मिक स्थळांनाही याचा फटका बसू लागला आहे. धार्मिक स्थळावर भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांमुळे अनेकांना संसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य सरकारने 31 मार्च पर्यंत धार्मिक स्थळ बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर महाराष्ट्रातील अनेक धार्मिक स्थळे 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्यात आली आहे. भारतात कोरोना व्हायरसचा दाखल झाल्यापासून महाराष्ट्रात कोरोना बाधित अधिक रुग्ण आढळले आहे. त्यापैंकी मुंबई येथील कस्तुरबा रुग्णालयात एका करोना बाधित व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती एएनआय वृत्त संस्थेने दिली आहे. यामुळे खूप लोक घाबरले असून त्यांनी घराबाहेर पडणे देखील टाळले आहे. हे देखील वाचा- Coronavirus: कोरोना व्हायरसचा धसका! सीएसएमटी, ठाणे, दादर, कल्याण रेल्वे स्थानकात प्रवाशांची थर्मोमीटर द्वारा चाचणी
दरम्यान सध्या महाराष्ट्रात 39 कोरोनाचे रूग्ण असून त्यापैकी मुंबई शहरात एका ज्येष्ठ नागरिकाचा कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे सध्या कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी अधिक चोख व्यवस्था करण्याला सरकार प्रयत्न करत आहे. यादृष्टीने सध्या मुंबई, पुणे, नागपूर शहरात कलम 144 लागू करत जमावबंदीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळा, अशी वारंवार विनंती करण्यात येत आहे.